Trump World Center: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेत आल्यापासून अनेक गोष्टी बदलल्या आहेत. ट्रम्प स्वतः व्यावसायिक असल्याने त्यांच्या कंपन्यांनाही याचा फायदा होत आहे. ट्रम्प आता आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ट्रंपची रिअल इस्टेट कंपनी अमेरिकेबाहेरील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारतात हातपाय पसरवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, ट्रम्प यांची कंपनी आता थेट पुण्यात १७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
ट्रम्प पुण्यात उभारणार चकाचक ऑफिस ट्रम्प ऑर्गनायझेशनसाठी स्थानिक परवानाधारक भागीदार ट्रिबेका डेव्हलपर्स आणि रिअल इस्टेट कंपनी कुंदन स्पेसेस यांच्या मदतीने ही गुंतवणूक करण्यात येणार आहे. या दोघांच्या भागीदारीत पुण्यातील कोरेगाव पार्क ॲनेक्सी येथील नॉर्थ मेन रोडवर ट्रम्प वर्ल्ड सेंटर बांधले जाणार आहे. ट्रायबेका डेव्हलपर्सच्या मते, या प्रकल्पावर अंदाजे १,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. नंतर महसूल ट्रायबेका डेव्हलपर्स आणि कुंदन स्पेसमध्ये ५०-५० टक्के विभागला जाईल.
टॉवरमध्ये अत्याधुनिक सुविधाएका अहवालानुसार, हा प्रकल्प १.६ दशलक्ष चौरस फूट जागेत तयार केला जाईल, ज्यामध्ये २ उंच टॉवर असतील, ज्यांची उंची २७ मजल्यांपेक्षा जास्त असेल. यापैकी एका टॉवरमध्ये स्वयंपूर्ण कार्यालय असेल, तर दुसऱ्या टॉवरमध्ये कार्यालयाची जागा भाड्याने दिली जाईल. या प्रकल्पात क्रेचे, सलून, ऑडिटोरियम, जिम, क्रीडा सुविधा तसेच स्पा, रेस्टॉरंट आणि किराणा दुकान अशा सुविधा असणार आहेत.
ट्रम्प समूह भारतात वाढतोय व्यवसायटॉवर २५ अब्ज रुपयांपेक्षा जास्त किमतीची विक्री करेल अशी अपेक्षा आहे. ट्रम्प समूहाचा देशातील हा पहिला व्यावसायिक कार्यालय प्रकल्प असेल, तर पुण्यातील कंपनीचा हा दुसरा प्रकल्प आहे. यापूर्वी, ट्रम्प समूहाने शहरातील निवासी प्रकल्प विकसित करण्यासाठी पंचशील रियल्टीसोबत भागीदारी केली होती. ट्रम्प ब्रँडचे भारतात आधीपासूनच ४ व्यावसायिक प्रकल्प आहेत. यामुळे भारत ही कंपनीसाठी अमेरिकेबाहेरील दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.