Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:56 IST

Donald Trump Tariff India China: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफचा बॉम्ब फोडण्यास सुरुवात केली आहे. ९० दिवसांचा कालावधी आता संपला आहे. सोमवारी ट्रम्प यांनी १४ देशांवर नवं शुल्क लावण्याची घोषणा केली.

Donald Trump Tariff India China: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफचा बॉम्ब फोडण्यास सुरुवात केली आहे. ९० दिवसांचा कालावधी आता संपला आहे. सोमवारी ट्रम्प यांनी १४ देशांवर नवं शुल्क लावण्याची घोषणा केली. अमेरिकेचा जवळचा समजला जाणारा जपान आणि दक्षिण कोरियाही यातून सुटलेला नाही. पहिली दोन पत्रंही या देशांना पाठवण्यात आली होती. त्यावर २५ टक्के शुल्क आकारण्यात आलं आहे. याशिवाय अमेरिकेनं दक्षिण आफ्रिका, कझाकस्तान, मलेशिया, म्यानमार आणि अगदी बांगलादेशवरही कडक शुल्क लादलंय. बांगलादेश हा त्या देशांपैकी एक आहे ज्यावर सर्वाधिक शुल्क लावण्यात आलं आहे. पण लोकांना आश्चर्याचा धक्का बसला की, अमेरिकेनं अद्याप भारत आणि चीनला स्पर्शही केलेला नाही.

आश्चर्याची बाब म्हणजे चीनही तसाच अमेरिकाविरोधी मानला जातो. तसंच नुकतेच दोन्ही देशांमध्ये शुल्कावरून प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी भारताला टॅरिफ किंग म्हटलं आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देश या यादीतून वगळले गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, या दोन्ही देशांवर शुल्क का लादण्यात आले नाही, हेही खुद्द ट्रम्प यांनी सांगितलंय.

रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?

व्यापार करार अंतिम

चीनसोबतचा व्यापार करार अंतिम झाला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कोणतंही वेगळं शुल्क लादलं जात नाही. भारतासोबतच्या करारावर वाटाघाटी सुरू आहेत आणि तो अंतिम होण्याच्या अगदी जवळ असल्याचं ट्रम्प म्हणाले. 'आम्ही ब्रिटनसोबत करार केला आहे, चीनसोबत करार केला आहे. अमेरिकेचे प्रतिनिधी ज्या देशांमध्ये भेटले, त्या उर्वरित देशांशी करार होण्याची शक्यता नाही, त्यामुळे त्यांना हे पत्र पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं.

भारतासोबत पेच कुठे अडकलाय?

अद्याप कोणतेही औपचारिक विधान समोर आलेले नाही, परंतु काही दिवसांपूर्वी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी संकेत दिले होते की, भारतातील शेतकऱ्यांच्या हिताच्या किंमतीवर कोणताही करार केला जाणार नाही. सध्या अमेरिका आणि भारत यांच्यात दुग्धजन्य पदार्थावरून चर्चा अडकले असण्याची शक्यता आहे. ज्यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे.

बांगलादेशवर ३५ टक्के शुल्क

अमेरिकेनं भारताचा शेजारी बांगलादेशवर ३५ टक्के शुल्क लादलं आहे. म्हणजेच बांगलादेशातून अमेरिकेत जाणाऱ्या कपड्यांवर ३५ टक्के शुल्क आकारलं जाणार आहे. यामुळे तेथे बांगलादेशी कपडे महाग होऊ शकतात आणि अमेरिकन कंपन्या येथून कपडे बनवणं थांबवू शकतात. याचा फायदा भारताला होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आज भारतातील वस्त्रोद्योगाच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. गोकलदास एक्सपोर्ट्स, वर्धमान टेक्सटाइल्स, केपीआर मिल्स आणि अरविंद मिल्स यांच्या समभागांमध्ये आज मोठी वाढ दिसून आली.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पशी जिनपिंगनरेंद्र मोदी