DA Hike Update : यंदा सरकारने एकामागून एक निर्णय घेत सर्वसामान्यांना सुखद धक्के दिले आहेत. जीएसटी कपातीची बातमी ताजी असतानाच आता आणखी एक गुड न्यूज आली आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच दिवाळीची मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्त्यात ३% वाढीला लवकरच मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. या वाढीमुळे एकूण महागाई भत्ता ५८% होईल. हा निर्णय ४८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६६ लाख पेन्शनधारकांसाठी खूप फायदेशीर ठरेल.
महागाई भत्ता १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे. सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळाकडून याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत जुलै आणि ऑगस्ट महिन्याची थकबाकी सुद्धा मिळेल. म्हणजेच, कर्मचाऱ्यांना त्यांच्या ऑक्टोबरच्या पगारात वाढीव डीएचा लाभ मिळेल, तसेच गेल्या तीन महिन्यांची थकबाकीही एकाच वेळी दिली जाईल.
महागाई भत्ता म्हणजे काय?महागाई भत्ता (डीए) हा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाईचा सामना करण्यासाठी दिला जाणारा अतिरिक्त भत्ता आहे. दररोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सतत वाढत असल्याने, डीए हे सुनिश्चित करतो की कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे आणि पेन्शनचे मूल्य कमी होऊ नये. या भत्त्याची गणना औद्योगिक कामगारांसाठी असलेल्या ग्राहक किंमत निर्देशांकच्या आधारावर केली जाते.
जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोगसातव्या वेतन आयोगातील ही शेवटची महागाई भत्ता वाढ असेल. यानंतर, जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होईल, ज्यामुळे महागाई भत्त्याची संपूर्ण प्रणालीच बदलेल. तज्ज्ञांनुसार, आठव्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. वेतनश्रेणीही वाढेल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३० ते ३४% पर्यंत वाढ दिसून येऊ शकते.
वाचा - GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
हा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांसाठी तात्काळ आर्थिक दिलासा देणारा असून, आठवा वेतन आयोग दीर्घकाळात त्यांच्यासाठी मोठा लाभ घेऊन येणार आहे.