Ratan Tata property : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्युपत्रातील एकएक गोष्ट आता समोर येत आहे. या मृत्यूपत्रात त्यांनी त्यांचा लाडका पाळीव श्वान ‘टिटो’ याच्यासाठीही संपत्तीचा काही भाग ठेवला आहे. मात्र, आता एका नव्या नावाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नुकत्याच उघडलेल्या मृत्युपत्रानुसार, रतन टाटा यांनी त्यांच्या उरलेल्या इस्टेटचा एक तृतीयांश भाग त्यांच्या जवळच्या मोहिनी मोहन दत्ता यांना दिला आहे. रेझिड्युरी इस्टेटमध्ये बँक खात्यांमध्ये जमा केलेले पैसे आणि वैयक्तिक वस्तूंच्या लिलावातून मिळणारे पैसे यांचा समावेश होतो. सूत्रांचे म्हणण्यानुसार, रतन टाटा यांच्या विश्वासू आणि टाटा समूहाच्या माजी कर्मचारी असलेल्या मोहिनी मोहन दत्ता यांना मालमत्तेत मोठा वाटा हवा आहे.
रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रानुसार ७४ वर्षीय दत्ता यांना त्यांच्या उरलेल्या संपत्तीचा एक तृतीयांश हिस्सा मिळणार आहे. यामध्ये बँकांमध्ये जमा केलेले ३५० कोटी रुपये. पेंटिंग आणि घड्याळे यांसारख्या वैयक्तिक वस्तूंच्या लिलावातून मिळालेल्या पैशांचा समावेश आहे. रतन टाटा यांच्या सावत्र बहिणी शिरीन जेजीभॉय आणि दिना जेजीभॉय यांना यात २ तृतीयांश हिस्सा मिळणार आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर या २ बहिणी त्यांच्या मृत्यूपत्राच्या अंमलबजावणी करणाऱ्या आहेत. रतन टाटा यांनी टाटा समूह आणि इतर कंपन्यांमधील त्यांचे शेअर्स यासारखी मोठी मालमत्ता त्यांच्या २ फाउंडेशनला दिली आहे.
मोहिनी मोहन दत्ता यांची ६५० कोटींची मागणी?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता यांनी रेझिड्युरी इस्टेटपैकी एक तृतीयांश भाग स्वीकारला आहे, परंतु, त्यांना सुमारे ६५० कोटी रुपयांची अपेक्षा आहे. टाटाच्या मालमत्तेचे औपचारिक मूल्यांकन करणे बाकी आहे. मात्र, दत्ता यांचा हिस्सा ६५० कोटी रुपये असण्याची शक्यता त्यांनी नाकारली आहे. हे मृत्यूपत्र अद्याप मुंबई उच्च न्यायालयात प्रोबेटसाठी सादर करण्यात आलेले नाही. तर दत्ता यांनी देखील याबाबत बोलण्यास नकार दिला.
टाटांच्या स्टेकहोल्डर्सनी सांगितले की त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा आणि त्यांच्या मुलांचे नाव रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात नाही. बंधू जिमी टाटा यांना ५० कोटी रुपये दिले आहेत. मात्र, पहिल्यांदाच टाटा कुटुंबाबाहेरील व्यक्ती एवढ्या मोठ्या रकमेची मागणी करत आहे. सावत्र बहिणींव्यतिरिक्त, टाटा ट्रस्टचे विश्वस्त देरियस खंबाटा आणि मेहली मिस्त्री हे देखील रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राचे एक्झिक्यूटर आहेत.
कोण आहे मोहिनी मोहन दत्ता?दिवंगत रतन टाटा आणि मोहिनी दत्ता यांची पहिल्यांदा जमशेदपूरमध्ये भेट झाली होती. तिथूनच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. रतन टाटा यांनी मोहिनी यांच्या कारकिर्दीला आणि इतर व्यावसायिक हितसंबंधांना कायम पाठिंबा दिला. ऑक्टोबर २०२४ मध्ये रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पत्रकारांशी बोलताना दत्ता यांनी त्यांच्यातील मैत्रीविषयी माहिती दिली होती. मोहिनी म्हणाल्या की, 'आम्ही जमशेदपूरमधील डीलर्स हॉस्टेलमध्ये पहिल्यांदा भेटलो, तेव्हा रतन टाटा २४ वर्षांचे होते. त्यांनी मला पुढे जाण्यास खूप मदत केली.