अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पानंतर बाजाराचे लक्ष महत्त्वाच्या नऊ क्षेत्रांकडे लागलेले असून, तेथेही निवडक कंपन्यांच्याच समभागांना मागणी असल्याने दिसते. त्यामुळे गुंतवणूकदारांना अतिशय विचारपूर्वक आपला पोर्टफोलिओ बदलून घेण्याची गरज आहे.
या अर्थसंकल्पामुळे बँका आणि आर्थिक संस्था, पायाभूत सुविधा आणि घरबांधणी, सिमेंट, जहाज बांधणी, एफएमसीजी, पर्यटन, वीजनिर्मिती आणि वितरण, वस्त्रोद्योग, आदी क्षेत्रांना चालना मिळणार आहे.
बजेटनंतर निरुत्साह
अर्थसंकल्पानंतर बाजारात निरुत्साह होता. केवळ स्मॉलकॅप निर्देशांक गतसप्ताहात किरकोळ प्रमाणात कमी झाला. अर्थसंकल्प अधिक विस्ताराने समोर येईल तसा बाजारात सकारात्मक वा नकारात्मक प्रभाव दिसेल. आता रिझर्व्ह बँकेच्या व्याजदराबाबत निर्णयाकडे बाजाराचे लक्ष असेल.
विदेशी वित्तसंस्थांची विक्री
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर परकीय वित्तसंस्थांनी विक्री करून त्याची नकारात्मक भूमिका दाखवून दिली आहे. शनिवारच्या दिवसामध्ये परकीय वित्तसंस्थांनी १३२७.०९ कोटी रुपयांची विक्री केली, तर देशांतर्गत वित्तसंस्थांनी ८२४.३८ कोटींची खरेदी करून बाजार सावरून धरला.
गेले वर्षभर जवळपास अशीच स्थिती असल्याचे दिसून आले आहे. या आर्थिक वर्षामध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारामधून ८८,६९३ कोटी काढून घेतले.
देशांतर्गत वित्तसंस्थांनी ८७,४१३ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे दिसून आले आहे. अजून किती दिवस परकीय वित्तसंस्था विक्री करीत राहणार यावर बाजाराची वाढ अवलंबून राहणार आहे.