Join us
Daily Top 2Weekly Top 5

एचडीएफसी बँकेतील मतभेद चव्हाट्यावर, अध्यक्ष चक्रवर्तींचा राजीनामा; बैठकीत तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 07:46 IST

सीईओंची तिसरी टर्म अन् बोर्डातील बदलांवरून वाद...

मुंबई : एचडीएफसी बँकेच्या सीईओच्या तिसऱ्या कार्यकाळावरून आणि बोर्ड नियुक्त्यांवरून झालेले मतभेद उघड झाले असून, अंशकालीन अध्यक्ष अतनू चक्रवर्ती यांनी १८ मार्च रोजी राजीनामा दिला. बैठकीदरम्यान कार्यकारी संचालकांशी तीव्र वाद झाल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, चक्रवर्ती व काही कार्यकारी संचालकांमधील मतभेद मंगळवारपर्यंत तीव्र झाले होते. विशेषतः एमडी आणि सीईओ शशिधर जगदीशन यांच्या पुनर्नियुक्तीबाबत ते साशंक होते. ऑक्टोबर २०२३ पासून सुरू झालेल्या त्यांच्या कार्यकाळाचा आढावा न घेता मुदतवाढ देण्यास त्यांनी विरोध केला. बोर्ड नियुक्त्यांवरूनही वाद झाला. भावेश झवेरी यांच्या जागी जिमी टाटा यांच्या नियुक्तीबाबत चक्रवर्ती यांनी आक्षेप घेतला होता. दीर्घकाळ सेवा हे एकमेव निकष नसावेत, असे त्यांचे मत होते.

भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी लिमिटेडच्या एचडीएफसी बँकेत विलीनीकरणापूर्वी उपाध्यक्ष म्हणून कार्य केलेले केकी मिस्त्री यांची एचडीएफसी बँकेच्या अंतरिम अंशकालीन अध्यक्षपदी १९ मार्चपासून तीन महिन्यांसाठी नियुक्ती करण्यास मंजुरी दिली.केकी मिस्त्री यांनी बँकेत सत्तासंघर्ष नसल्याचे स्पष्ट केले. “नातेसंबंधातील काही मुद्दे असू शकतात, मात्र व्यवस्थापन एकसंघ आहे,” असे त्यांनी सांगितले.

एचडीएफसी बँक ही संस्था आहे. बँकेचे मी पाच वर्षे जतन आणि संवर्धन केले. मी बँकेत कोणत्याही गैरप्रकारांकडे बोट दाखवत नाही. माझ्या विचारसरणी संस्थेशी जुळत नव्हती आणि त्यामुळे वेगळे होण्याची वेळ आली.अतनू चक्रवर्ती, माजी अध्यक्ष 

सखोल आढावा घेण्याची केली होती मागणीएचडीएफसी विलीनीकरणाचे फायदे पूर्णपणे दिसून न आल्याचे त्यांनी नमूद केले होते. 

लिलावती हॉस्पिटल प्रकरणापासून सुरू झालेल्या आरोपांमुळे आणि त्यानंतर क्रेडिट सुईसच्या एटी-१ बाँड्सच्या चुकीच्या विक्रीच्या तक्रारींमुळे, जगदीशन यांच्या कामगिरीचा सखोल आढावा घेण्याची गरज चक्रवर्ती यांनी व्यक्त केली होती. 

बँकेच्या एमडी आणि सीईओ पदासाठी तीन वर्षांच्या मुदतवाढीपूर्वी हा आढावा आवश्यक असल्याचे त्यांचे मत होते.

काय म्हणाले चक्रवर्ती?गव्हर्नन्स, नामनिर्देशन आणि वेतन समितीच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात चक्रवर्ती यांनी म्हटले की, “गेल्या दोन वर्षांत बँकेत घडलेल्या काही घटना आणि पद्धती माझ्या वैयक्तिक मूल्ये आणि नैतिकतेशी सुसंगत नाहीत. याच कारणावरून मी वरील निर्णय घेतला. 

शेअर्स घसरलेएचडीएफसी बँकेच्या शेअर्स सुमारे ५% हून अधिक घसरले. अंशकालीन अध्यक्ष अतनू चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचे दिसून आले.

English
हिंदी सारांश
Web Title : HDFC Bank Chairman Resigns Amidst Differences Over CEO Tenure

Web Summary : HDFC Bank's part-time chairman, Atanu Chakraborty, resigned due to disagreements over the CEO's reappointment and board nominations. Differences arose regarding extending CEO Sashidhar Jagdishan's term without review and objections to board appointments. The RBI approved Keki Mistry as interim chairman.
टॅग्स :एचडीएफसीबँकिंग क्षेत्र