Join us
Daily Top 2Weekly Top 5

शुन्यातून विश्व निर्माण करणा-या धीरुभाईंनी मुकेश अंबानींना दिलेला सक्सेस मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 16:42 IST

शून्यातून विश्व निर्माण करणा-या धीरुभाई अंबानी यांचा आज जन्मदिवस आहे. 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातमधील सौराष्ट्रातील जुनागड जिल्ह्यातील एका छोटयाशा गावात धीरुभाईंचा जन्म झाला.

ठळक मुद्देधीरुभाईंचे एकूणच व्यक्तिमत्व आज च्या तरुणपिढीसाठी प्रेरणादायी असेच आहे.2016 साली भारत सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. 

मुंबई - शून्यातून विश्व निर्माण करणा-या धीरुभाई अंबानी यांचा आज जन्मदिवस आहे. 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातमधील सौराष्ट्रातील जुनागड जिल्ह्यातील एका छोटयाशा गावात धीरुभाईंचा जन्म झाला. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या धीरुभाई यांचा उद्योगविश्वातील प्रवास थक्क करुन सोडणारा आहे. अगदी सुरुवातीच्या दिवसात धीरुभाईंनी सर्वसामान्यांप्रमाणे नोकरीचा अनुभव घेतला. 

व्यवस्थेशी संघर्ष केला. त्यानंतर हे उद्योग साम्राज्य उभारले. धीरुभाईंचे एकूणच व्यक्तिमत्व आज च्या तरुणपिढीसाठी प्रेरणादायी असेच आहे.  6 जुलै 2002 रोजी वयाच्या 70 व्या वर्षीमुंबईत धीरुभाईंचे निधन झाले. 2016 साली भारत सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. 

व्यापार-उद्योगासाठीचे त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना नागरी क्षेत्रातील दुस-या क्रमाकांच्या या पुरस्कारने सन्मानित केले. 1966 साली धीरुभाईंनी रिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापन केली. 1977 साली त्यांच्या कंपनीची शेअरबाजारात नोंदणी झाली.   यावर्षी एका कार्यक्रमात बोलताना मुकेश अंबानी यांनी त्यांना वडिलांकडून म्हणजेच धीरुभाई अंबानींकडून मिळालेला सक्सेस मंत्र सांगितला.          

1) कुठलही काम सुरु करण्याआधी आपल काय लक्ष्य आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याचवेळी यश मिळते. लक्ष्य निश्चित न करता वाटचाल केली तर हाती काही लागत नाही. 

2) समस्या निर्माण झाल्यानंतर ती सोडवणे पुरेसे नाही, तर ती निर्माण कशी झाली ते शोधणे आवश्यक आहे. एकदा समस्या समजल्यानंतर आपण त्यावर तोडगा शोधून काढतोच.

3) व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात अनेक समस्या असतात. कुठल्याही समस्येच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे तरच मार्ग सापडतो. 

4) प्रत्येक व्यक्तीला यश आणि अपयशाचा सामना करावा लागतो. अपयश आले म्हणून खचून जाऊ नका. खंबीर राहून परिस्थितीचा सामना करा. 

5) आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन खूप महत्वाचा असतो. सकारात्मक दृष्टीकोनामुळे यश मिळते. आपल्या आसपास अनेक नकारात्मक विचारसरणीचे लोक असतात. पण आपल्याला सकारात्मकता निर्माण करायचीय हे लक्षात ठेवा. 

6) एका चांगल्या टीमशिवाय तुम्ही काही मिळवू शकत नाही. त्यामुळे चांगल्या लोकांबरोबर टीम बनवा आणि मेहनत करत रहा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल.                                          

टॅग्स :रिलायन्स जिओ