Join us

Dhanteras, Diwali 2021: मंदीचे मळभ हटले! धनत्रयोदशीला देशभरात तब्बल १५ हजार किलो सोन्याची विक्री, हजारो कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 11:56 IST

Dhanteras, Diwali 2021: यावेळी धनत्रयोदशीला तब्बल १५ टन सोन्याचे दागिने, बार आणि नाण्यांची विक्री झाली. धनत्रयोदशीला देशभरात सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपयांचा सराफा व्यवसाय झाल्याचे वृत्त आहे.

मुंबई - देशात आलेली कोरोना विषाणूची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटाची भयावहता विसरून देश दिवाळीचा उत्साह साजरा करण्यात गुंतला आहे. यावेळी धनत्रयोदशीला तब्बल १५ टन सोन्याचे दागिने, बार आणि नाण्यांची विक्री झाली. धनत्रयोदशीला देशभरात सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपयांचा सराफा व्यवसाय झाल्याचे वृत्त आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT)ने हा दावा केला आहे. CAITचे अध्यक्ष बी.सी. भरतीय आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, धनत्रयोदशीचे धार्मिक महत्त्व मोठे आहे. त्यामुळे या दिवशी ज्वेलरीची खूप विक्री झाली आहे. त्यांनी सांगितले की, सोने आणि ज्वेलरीची विक्री पुढे अजून वाढणार आहे. कारण नोव्हेंबरच्या मध्यापासून लग्नांचा हंगाम सुरू होईल.

सध्या सोने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा ८ हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून आला आहे. कोविड-१९ चे रुग्ण कमी झाल्यामुळे ग्राहकांचे सेंटिमेंट पॉझिटिव्ह झाले आहेत. यावर्षी जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये देशात सोन्याच्या मागणीमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोना लॉकडाऊन संपल्यानंतर सातत्याने व्यवसाय वाढत आहे.

कॉन्फेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने सांगितले की, दागिने उद्योग कोरोनाच्या साथीमुळे आलेल्या मंदीमधून आता सावरला आहे. कॅटने सांगितले की, धनत्रयोदशीला देशभरात सुमारे ७ हजार ५०० कोटी रुपयांची विक्री झाली सुमारे १५ सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली. यामध्ये दिल्लीत १ हजार कोटी रुपये, महाराष्ट्रात १ हजार ५०० कोटी रुपये, उत्तर प्रदेशात ६०० कोटी रुपयांची अंदाजे विक्री झाली. तर दक्षिण भारतामध्ये सुमारे दोन हजार कोटी रुपयांची विक्री झाली.  

टॅग्स :सोनंदिवाळी 2021व्यवसाय