Join us
Daily Top 2Weekly Top 5

अकासा कंपनीला कोर्टाचा दणका; ट्रॅव्हल एजंटला १.०८ कोटी रक्कम देण्याचे आदेश, काय आहे खटला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 08:46 IST

मे २०२३ एअरलाइन्स कंपनीकडून ही बुकिंग कॅन्सल करण्यात आली. ३ महिन्यानंतर ऑगस्ट २०२३ साली आगाऊ भरलेली रक्कमही एजंटला परत केली.

नवी दिल्ली - भारतीय विमान कंपनी अकासा एअरला एका ट्रॅव्हल एजंटचे ग्रुप बुकिंग रद्द करणे चांगलेच महागात पडले आहे. दिल्लीच्या व्यावसायिक कोर्टाने कंपनीला निर्देश देत एजंटला १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. अकासा एअर कंपनीने एका ट्रॅव्हल एजंटच्या ६४० सीटचे ग्रुप बुकिंग रद्द केले होते.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण ABS टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्सशी निगडित आहे. या ट्रॅव्हल कंपनीने एप्रिल २०२३ साली अकासा एअरमध्ये ६४० सीटचे बुकिंग केले होते. दिल्ली गोवा आणि गोवा दिल्ली अशी ही फ्लाईट बुकिंग होती. २३ डिसेंबर २०२३ ते १३ जानेवारी २०२४ या काळातील ही बुकिंग होती जेव्हा या मार्गावर ट्रॅव्हल पीक पीरियड मानला जातो. या बुकिंगसाठी एजंटने पोर्टलद्वारे ४ लाख ८२ हजार ६४० रूपयांचे पेमेंट केले, जी भाड्याच्या रक्कमेचे २५ टक्के होते.  त्यानंतर कंपनीने पॅसेंजर नेम रेकॉर्ड म्हणजे PNR ही जनरेट केला. यानंतर महिनाभराने मे २०२३ एअरलाइन्स कंपनीकडून ही बुकिंग कॅन्सल करण्यात आली. ३ महिन्यानंतर ऑगस्ट २०२३ साली आगाऊ भरलेली रक्कमही एजंटला परत केली.

का रद्द केले बुकिंग?

अकासा एअर कंपनीचे म्हणणं होते की, ट्रॅव्हल एजंटने ग्रुप बुकिंग केले होते. जर ७० प्रवाशांपेक्षा जास्त ग्रुप बुकिंग असेल तर त्यासाठी ५० टक्के रक्कम आगाऊ द्यावी लागते. ट्रॅव्हल एजंटने ही अट पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांचे बुकिंग रद्द करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण ट्रॅव्हल एजंटकडून साकेत येथील कोर्टात पोहचले. एअरलाइन कंपनीने माझ्या ८ ग्रुप बुकिंगसाठी आगाऊ पैसे घेऊनही बुकिंग रद्द केले. बुकिंग काळात अथवा त्यानंतरही एअरलाईन कंपनीकडून कुठलीही चर्चा केली नाही. ज्यातून त्यांना किती आगाऊ रक्कम भरायची आहे हे सांगितले जाईल असं एजंटने कोर्टात सांगितले.

दरम्यान, एकदा एअरलाइनने आगाऊ पेमेंट स्वीकारल्यानंतर आणि पीएनआर नंबरही जनरेट केल्यावर मग कंपनी भारतीय करार कायदा १८७२ अंतर्गत या कराराचे पालन करण्यास बांधील आहे. करार संपुष्टात आल्यानंतर आगाऊ रक्कम परत करणे पुरेसे नाही. त्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई विमान कंपनीने ट्रॅव्हल एजंटला देखील करावी. बुकिंग रद्द केल्याने झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी अकासाने एजंटला १,०८,८०,००० रुपये द्यावेत असं जिल्हा न्यायाधीश ललित कुमार यांनी २३ फेब्रुवारी रोजीच्या त्यांच्या आदेशात म्हटले आहे. मात्र कोर्टाने नुकसान आणि मानसिक छळासाठी भरपाई द्यावी हा एजंटचा दावा फेटाळून लावला.

सदर वाद न्यायप्रविष्ट, कायदेशीर टीमचा सल्ला घेणार - अकासा एअर  

आम्ही न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करतो. कोर्टाने दिलेल्या आदेशावर आम्ही आमच्या कायदेशीर टीमचा सल्ला घेत आहोत. अकासा एअर सर्व ट्रॅव्हल एजंटसोबत निष्पक्ष आणि पारदर्शक व्यवहारासाठी कटिबद्ध आहे. ते आमच्या कंपनीचा अविभाज्य भाग आहेत. हा वाद न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही यावर अधिक भाष्य करू शकत नाही अशी प्रतिक्रिया अकासा एअर कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Akasa Air Fined: Court Orders ₹1.08 Crore Payment to Agent

Web Summary : Akasa Air faces a ₹1.08 crore penalty for canceling a travel agent's group booking. The court ruled Akasa must compensate ABS Tours & Travels for losses incurred after the airline canceled 640 seats booked for the peak season, despite initial payment and PNR generation.
टॅग्स :न्यायालयविमान