Join us

गडचिरोलीत 'या' क्षेत्रात होणार ५,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक; दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 16:45 IST

Davos World Economic Forum Meeting : महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये ५२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी कल्याणी समूहाने करार केला आहे.

दावोस : महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर रोजगाराच्या दृष्टीने पहिली मोठी बातमी समोर आली आहे. दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पहिला सामंजस्य करार झाला आहे. कल्याणी समूहाकडून गडचिरोलीमध्ये पोलाद उद्योगासाठी ५,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या संदर्भात कल्याणी उद्योग समूहाने महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार केला आहे. 

३ क्षेत्रात होणार गुंतवणूककल्याणी समूह आणि महाराष्ट्र राज्य शासनामध्ये संरक्षण, स्टील आणि इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रात करार करण्यात आला आहे. या माध्यमातून पोलाद उद्योगासाठी ५ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीत केली जाणार आहे. त्यामाध्यमातून ४ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. कल्याणी समूहाचे प्रमुख अमित कल्याणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हा करार केला आहे. 

स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. यंदा भारताने आपले सर्वांत मोठे शिष्टमंडळ त्यासाठी पाठवले असून ही बैठक पाच दिवस चालेल

भविष्यात अशी परिषद मुंबईत आयोजित होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी होरॅसिसचे अध्यक्ष फ्रँक जर्गन रिक्टर यांची भेट घेतली. फ्रँक हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे माजी संचालक आहेत. येणार्‍या काळात मुंबईत जागतिक कंपन्यांची एक परिषद आयोजित करण्यासाठी त्यांनी यावेळी पुढाकार दर्शविला. नवीन तंत्रज्ञान, नाविन्य यावर भर देताना असे आयोजन राज्य सरकारसोबत सहकार्याने करण्याबाबत तसेच होरॅसिसचे मुंबईत मुख्यालय असण्याबाबत सुद्धा यावेळी प्राथमिक चर्चा झाली.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसगडचिरोलीमहाराष्ट्र