Join us

बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 10:45 IST

Dating App Cafe Scam : ऑनलाइन घडणाऱ्या या घोटाळ्यांसाठी सायबर पोलिसांना माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून पुढील कारवाई करता येईल आणि इतर कोणाची फसवणूक होणार नाही.

Dating App Cafe Scam : आजच्या काळात प्रेम शोधण्यासाठी डेटींग ॲप्स खूप लोकप्रिय झाले आहेत, पण आता या ॲप्समुळे एक नवीन स्कॅम उघडकीस आला आहे. प्रेमाचे नाटक करून तरूणांच्या खिशावर दरोडा टाकण्याचा एक नवीन प्रकार दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये वेगाने पसरत आहे. दिल्लीतून अशीच एक ताजी घटना समोर आली आहे, जिथे एका तरुणाला डेटींग ॲपवर भेटणे महागात पडले आहे.

कसा केला जातो स्कॅम?यात सहभागी असलेल्या मुली डेटींग ॲपवर तरूणांशी आधी बोलणे सुरू करतात. बोलता-बोलता त्या त्यांना एका खास कॅफेमध्ये भेटायला बोलावतात. गंमत म्हणजे, हे कॅफे आधीच या घोटाळ्याचा भाग असतात! कॅफेमध्ये पोहोचल्यावर, ती मुलगी तुम्हाला मेन्यू न दाखवता किंवा किंमती न सांगताच महागडे ड्रिंक्स, हुक्का किंवा पदार्थ ऑर्डर करायला सुरुवात करते. तुम्हाला काहीही कळत नाही. जेव्हा बिल येते, तेव्हा ते हजारो रुपयांचे असते! जर तुम्ही बिल देण्यास नकार दिला, तर कॅफे कर्मचारी आणि ती मुलगी दोघे मिळून तुम्हाला धमक्या द्यायला सुरुवात करतात. कधी पोलिसांना बोलावण्याची, तर कधी दुप्पट दंड लावण्याची धमकी देतात.

दिल्लीतील तरुणाचा अनुभवदिल्लीतील एका तरुणाने आपला अनुभव रेडिटवर शेअर केला आहे. डेटींग ॲपवर एका मुलीशी गप्पा मारल्यानंतर तिने त्याला कैलास येथील एका कॅफेमध्ये भेटायला बोलावले. त्याच्या खिशात फक्त ३,००० रुपये होते. पण त्याच्या डेटने, जिचे नाव भूमी होते, न विचारताच महागडे 'जेगरबॉम्ब' (एकाची किंमत १,२०० रुपये) आणि रेड बुल ऑर्डर करायला सुरुवात केली.

जेव्हा बिल आले, तेव्हा ते तब्बल ११,९५८ होते! तरुणाने भूमीला पैसे देण्यास सांगितले, तर ती म्हणाली, "माझ्याकडे फक्त १०० रुपये आहेत" आणि तिथून पळ काढला. कॅफे कर्मचाऱ्यांनी बिल दोन भागात करायला नकार दिला आणि कॅफेच्या कथित मालकिणीने, तरुणाला धमकी दिली की जर बिल भरले नाही तर पोलिसांना बोलावले जाईल आणि १०,००० रुपये दंडही भरावा लागेल, ज्यामुळे बिल २२,००० रुपये होईल!

शेवटी, त्या तरुणाने मित्राला बोलावलं. खूप वादविवादानंतर हे प्रकरण २,५०० रुपयांमध्ये मिटले, पण या घटनेने त्याला मोठा धडा शिकवला. त्याने म्हटले की, आता तो डेटींग ॲप्सवर कोणालाही भेटण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल.

रेडिटवर उघड झाले 'कॅफे'चे गुपित!रेडिटवर या घटनेनंतर अनेकांनी कमेंट केल्या. अनेकांनी हा एक नियोजित घोटाळा असल्याचे म्हटले. एका वापरकर्त्याने तर लिहिले की, "ही मुलगी कॅफेशी मिळालेली असेल. हा एक जुना घोटाळा आहे ज्यात मुली आणि कॅफे मिळून लोकांना लुटतात." अनेक वापरकर्त्यांनी या कॅफेचे नाव घेऊन सांगितले की, असे घोटाळे करण्यासाठी हे ठिकाण कुप्रसिद्ध आहे आणि दिल्ली व मुंबईतील अनेक कॅफे असेच घोटाळे चालवत आहेत.

अशा सायबर घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी काय करावे?डेटींग ॲप्स महत्त्वाचे असले तरी, त्यांच्यापासून सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटणार असाल, तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा.

वाचा - नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!

  • सुरक्षित ठिकाण निवडा: नेहमी असे ठिकाण निवडा जे लोकप्रिय असेल आणि ज्याचे चांगले रिव्ह्यूज असतील.
  • मेनू आणि किंमती तपासा: काहीही ऑर्डर करण्यापूर्वी मेनू आणि किंमती काळजीपूर्वक तपासा.
  • बिलावर लक्ष ठेवा: तुमची डेट काही ऑर्डर करत असेल तर त्याकडे लक्ष द्या. वेळोवेळी बिल तपासा.
  • शंका आल्यास सावध रहा: जर तुमची डेट वारंवार महागड्या वस्तू ऑर्डर करत असेल किंवा लवकर बिल मागत असेल, तर ताबडतोब सावध व्हा.
  • कमी पैसे सोबत ठेवा: तुमच्या खिशात मर्यादित पैसे ठेवा आणि कार्डचा वापर करताना सावधगिरी बाळगा.
टॅग्स :सायबर क्राइमधोकेबाजीगुन्हेगारीबँकिंग क्षेत्र