Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 17:05 IST

Cyber Fraud Alert : एका निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याची सायबर भामट्यांनी तब्बल ८ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

Cyber Fraud Alert : गेल्या वर्षभरापासून सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावलं उचलली आहे. मात्र, त्यानंतरही हे प्रकार थांबण्याचं नाव घेताना दिसत नसल्याचे समोर आले आहे. सायबर भामट्यांच्या जाळ्यात केवळ अशिक्षित किंवा तांत्रिक माहिती नसलेले लोकच अडकतात हा समज खोटा ठरणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना पंजाबमध्ये समोर आली आहे. शेअर बाजारात लवकर आणि प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याला तब्बल ८.१ कोटी रुपयांचा गंडा घातला. या फसवणुकीच्या धक्क्यातून आणि मानसिक दबावातून संबंधित अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याने संपूर्ण पोलीस दलात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

या फसवणुकीची सुरुवात एका बनावट 'वेल्थ मॅनेजर'च्या संपर्कापासून झाली. आरोपीने स्वतःला 'डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर' आणि त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संबंधित असल्याचे भासवून या अधिकाऱ्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवरील काही विशेष गुंतवणूक गटांमध्ये सामील करण्यात आले. सुरुवातीला एका बनावट ॲपच्या माध्यमातून त्यांना मोठा नफा होत असल्याचे दाखवण्यात आले, ज्यामुळे त्यांचा या योजनेवर विश्वास बसला. हाच बनावट नफा पुन्हा गुंतवण्यासाठी आणि अधिक परतावा मिळवण्यासाठी त्यांच्यावर सातत्याने दबाव टाकण्यात आला. या आमिषाला बळी पडून संबंधित अधिकाऱ्याने आपल्या आयुष्यभराची पुंजी, तसेच मित्रपरिवाराकडून आणि नातेवाईकांकडून मोठी रक्कम उधार घेऊन या योजनेत गुंतवली.

ज्यावेळी अधिकाऱ्याने आपली मूळ रक्कम आणि झालेला नफा काढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी सायबर भामट्यांनी आपले खरे रूप दाखवले. पैसे परत मिळवण्यासाठी टॅक्स, प्रोसेसिंग फी आणि इतर विविध शुल्काच्या नावाखाली त्यांच्याकडून आणखी पैसे उकळण्यात आले. अनेक वेळा बँक ट्रान्सफर करूनही एकही रुपया परत न मिळाल्याने आपल्याला लुटले गेल्याची जाणीव त्यांना झाली. या आर्थिक नुकसानीमुळे आलेल्या प्रचंड नैराश्यातून त्यांनी मृत्यूला जवळ करण्याचा निर्णय घेतला.

वाचा - सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते

आत्महत्येपूर्वी या अधिकाऱ्याने १२ पानांची सविस्तर सुसाइड नोट लिहिली असून, त्यात या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. हे सायबर गुन्हेगार अत्यंत संघटित पद्धतीने काम करत असून यात अनेक बँक खात्यांचा गुंतागुंतीचा वापर केला गेल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाचा मुळापासून तपास करून ही रक्कम जप्त करावी आणि ती आपल्या कुटुंबाला परत मिळवून द्यावी, अशी कळकळीची विनंती त्यांनी आपल्या चिठ्ठीत पोलिसांना केली आहे. ही घटना सायबर सुरक्षेबाबत धोक्याची घंटा असून, कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय आणि अवास्तव नफ्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Cyber Fraud: IPS Officer Duped of $960,000, Dies by Suicide

Web Summary : A retired IPS officer in Punjab lost $960,000 to cyber fraudsters promising high returns in the stock market. Duped by a fake wealth manager, he invested life savings and loans. After being unable to withdraw funds and facing demands for more fees, he died by suicide, leaving a note detailing the scam.
टॅग्स :सायबर क्राइमपंजाबबँकिंग क्षेत्रपैसा