Join us

सध्या ना लग्नाचे मुहूर्त, ना कोणतेही सणवार; सोन्याचा दर ९८ हजार रुपये प्रति तोळ्यावर स्थिर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 09:25 IST

सोन्याचा भाव ९८ हजारांच्या पुढे जाणार नाही. पुढील दोन ते तीन दिवस सोने ९८ हजार राहील. त्यानंतर कदाचित सोने ९५ हजारांवर येण्याची शक्यता आहे. मात्र ही परिस्थिती बाजाराच्या चढ-उतारावर अवलंबून असेल.

मुंबई : सोन्याचा भाव आजघडीला ९८ हजार रुपये तोळा असून, पुढील काही दिवस भाव वरचढ होण्याची शक्यता कमीच असल्याचे सराफ बाजाराकडून सांगण्यात आले. सध्या लग्नाचे मुहूर्त नाहीत. शिवाय सोन्याची जोरदार खरेदी विक्री होईल, असे सणही नाहीत. परिणामी सोन्याच्या भावात फार काही चढ-उतार होतील, अशी शक्यता कमीच आहे, असे सराफ बाजाराकडून सांगण्यात आले.

सोन्याचा भाव ९८ हजारांच्या पुढे जाणार नाही. पुढील दोन ते तीन दिवस सोने ९८ हजार राहील. त्यानंतर कदाचित सोने ९५ हजारांवर येण्याची शक्यता आहे. मात्र ही परिस्थिती बाजाराच्या चढ-उतारावर अवलंबून असेल.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरदरम्यान सोन्याच्या फार मोठ्या खरेदीची अपेक्षा नाही. कारण सणवार नाही. शिवाय लग्नाचे मुहूर्तही नाहीत. दिवाळीनंतर सोन्याच्या खरेदी विक्रीला तेजी येईल.

सध्या सोनसाखळी, कानातले, मंगळसूत्र अशी छोटी मोठी खरेदी सुरू आहे. जुने सोने देऊन नवीन सोने घेतले जात नाही. खरेदी-विक्रीचे व्यवहार थंडच आहेत.

अमेरिकेची धोरणे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राबविल्या जात असलेल्या धोरणांचा बाजारपेठांवर परिणाम होत असून, हेच सोन्यालाही लागू आहे. हिऱ्यांच्या तुलनेत सोन्याला अधिक मागणी असते. याचे कारण सोन्यात परतावा अधिक मिळतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी सध्या स्थिर आहेत. इस्त्रायल आणि इराण युद्धाचा मोठा परिणाम सोन्याच्या भावावर झाला होता. मात्र आता भाव ९८ हजार एवढा स्थिर राहील. चांदी १ लाख ७ हजार रुपये किलो आहे. सध्या जुने सोने देऊन नवीन सोने घेतले जात आहे. फार काही मोठी खरेदी होत नाही.

निर्भय सिंग, सुवर्ण विक्रेते

पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितलेले मुहूर्त...

शुद्ध विवाह मुहूर्त

जुलै ते ऑक्टोबर विवाह मुहूर्त नाहीत.

नोव्हेंबर २३, २५, २६, २७, ३०

डिसेंबर  २, ५

अडचणीच्या वेळी काढीव मुहूर्त

ऑक्टोबर १, २, ६, ८, १२, १६, २४, २६, ३०, ३१

नोव्हेंबर ३, ४, ७, १३, १५

डिसेंबर १२, १३, १५

टॅग्स :सोनं