Join us

सोने आणि शेअर बाजार दोन्हीत चांदीच चांदी; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 06:22 IST

ऑक्टोबर २०१८ पासून सोन्याने तेजी पकडली आहे. प्रती औंस अमेरिकन डॉलर मध्ये सोन्याचा भाव तब्बल ७० टक्के वाढला.

डॉ. पुष्कर कुलकर्णीमुंबई : शेअर बाजार जेव्हा तेजीत असतो तेव्हा सोने (कमोडिटी) मार्केट खाली असणे आणि जेव्हा शेअर बाजार मंदीत असतो तेव्हा सोने तेजीत असणे असा अनुभव बऱ्याच वेळा आलेला आहे. सध्या सोने - चांदी आणि शेअर बाजार दोनही तेजीत आहेत. याचे थोडक्यात विश्लेषण करू. 

ऑक्टोबर २०१८ पासून सोन्याने तेजी पकडली आहे. प्रती औंस अमेरिकन डॉलर मध्ये सोन्याचा भाव तब्बल ७० टक्के वाढला. कोरोनाकाळात शेअर बाजार सपाटून आपटला परंतु त्यानंतर बाजाराने वर्षभरात एकतर्फा तेजी पकडली. गुंतवणूकदार तिप्पट वाढले. यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक प्रचंड वाढली. एकीकडे अमेरिकन डॉलर तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन सोन्याच्या दरात वाढ करत आहे. कारण सोन्याचा दर प्रती औंस डॉलरमध्ये ठरतो. युद्धसदृश परिस्थितीमुळे कमोडिटी मार्केट तेजी पकडते. त्यात सोने आणि चांदी दोनही धातू तेजीत राहतात. 

रशिया-युक्रेन व आता इस्राईल-हमास युद्धामुळे सोन्याने तेजी धरली. सध्या सोन्याचा दर प्रती औंस २१०० अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला. भारतीय चलनात एका डॉलरला ८४ रुपये मोजावे लागतात. यामुळे सोन्याने उच्चतम पातळी गाठली आहे. जागतिक पातळीवर भारताचा जीडीपी व कॉर्पोरेट कामगिरी उत्तम सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारही वाढल्याने शेअर बाजारसुध्दा वरच्या पातळीवर ट्रेड करत आहे.  परवा चार राज्यांच्या निवडणूक निकालाने आगामी लोकसभा निवडणुकीत भारतात पुन्हा एकदा स्थिर सरकार स्थापन होण्याची शक्यता वाढल्याने त्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर सोमवारी दिसून आला. एकूणच भारतीय शेअर बाजार आणि कमोडिटी मार्केट दोनही साठी सकारात्मक परिस्थिती असल्याने बाजार आणि  सोने एकाच दिशेने वाढत असल्याचे आपण पाहात सध्या आहोत. एकूण काय दोनही गुंतवणूकदारांची चांदीच चांदी!

टॅग्स :सोनंशेअर बाजार