Join us
Daily Top 2Weekly Top 5

४ अब्ज डॉलर्सचा गंडा घालणारी ‘क्रिप्टोक्विन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 12:13 IST

अशी ही महिला आहे तरी कोण? या महिलेचं नाव आहे रुजा इग्नाटोवा. ‘क्रिप्टोक्विन’ म्हणून ती प्रसिद्ध आहे

‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची उदाहरणे जगभरात कमी नाहीत. भारतासह अनेक राष्ट्रांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान तर झालं आहेच, देशाची प्रतिमाही कलंकित झाली आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या त्या राष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची, संवेदनक्षम असलेली माहिती ‘शत्रू’ राष्ट्रांकडे पोहोचली आहे. याच गोष्टीचा ‘शत्रू’ राष्ट्रांनी भूतकाळात, तर फायदा घेतला आहेच, पण भविष्यकाळातही यामुळे आपल्या ताटात काय वाढून ठेवलं आहे, याचा अंदाज आज तरी कोणालाच नाही. अशा ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात कोणीही अडकू नये, यासाठी मोठी खबरदारी घेतली जात असली, तरी अमेरिकेतील एका सुंदरीनं आपल्या सौंदर्याच्या आणि लोकांना भुलवण्याच्या अनोख्या अदाकारीनं आजवर हजारो लोकांना चंदन लावलं आहे. सर्वसामान्यांच्या खिशातील अक्षरश: कोट्यवधी रुपये अलगद लांबवून छू-मंतर केलं आहे. अमेरिकेसह अनेक देशांतील पोलीस या महिलेच्या मागावर आहेत, पण आतापर्यंत तरी तिनं सगळ्यांच्या हातावर तुरी दिल्या आहेत. 

अशी ही महिला आहे तरी कोण? या महिलेचं नाव आहे रुजा इग्नाटोवा. ‘क्रिप्टोक्विन’ म्हणून ती प्रसिद्ध आहे. मूळची ती बल्गेरियाची, पण अमेरिकन सुरक्षा यंत्रणा ‘एफबीआय’च्या (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स) मोस्ट वॉण्टेड फरार गुन्हेगारांच्या यादीत ती चक्क पहिल्या दहामध्ये आहे. या यादीत अनेक नामचीन खुनी, दरोडेखोर, गँगस्टर्स यांचा समावेश आहे. एफबीआयनं त्यांच्या याच मोस्ट वाण्टेड यादीत रुजाच्या नावाचा समावेश केल्यानं ती किती ‘खतरनाक’ असेल हे लक्षात येतं. अर्थात या यादीत रुजाचा समावेश असला तरी इतरांपेक्षा ती वेगळी आहे. तिनं आजवर कोणाचाही खून केला नाही, कुठलाही रक्तपात केला नाही, रुढार्थानं दरोडेही टाकले नाहीत, तरीही ‘दरोडेखोरांच्या’ यादीत पहिल्या क्रमांकावर शोभेल अशी कृत्यं तिनं केली आहेत. रुजानं असं केलं तरी काय?.. त्याची कहाणीही मोठी मजेशीर आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी क्रिप्टोकरन्सीनं जेव्हा लोकांना अक्षरश: वेड लावलं होतं, त्यावेळी वाहत्या पाण्याची दिशा लक्षात घेऊन रुजानंही ‘वनकॉइन’ नावाचं आपलं एक आभासी चलन सुरू केलं. बिटकॉइनपेक्षा हे चलन अधिक ‘चलनी’ असल्याचं सांगत आणि बक्कळ पैसा मिळवून देण्याचं आमिष दाखवत तिनं लोकांवर माेहिनी टाकायला सुरुवात केली. रुढार्थानंही ती देखणी आणि बोलायला ‘पोपट’ होती. 

आपल्या आभासी चलनाचा जोरदार प्रचार तिनं सुरू केला. लोक तिच्या या मोहजालात फसले. जास्त पैसे मिळविण्याच्या मोहात आपल्याकडची असेल नसेल ती पुंजी लोकांनी रुजाकडे गुंतवली. रुजा याच गोष्टीची वाट पाहात होती. त्यावेळी बिटकॉइन हे आभासी चलन जगभरात अत्यंत प्रचलित होतं. या चलनाची सद्दी आता संपली असं सांगत आपल्या ‘वनकॉइन’ या चलनाचं जोरदार मार्केटिंग तिनं सुरू केलं. ते साल होतं २०१४. लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता या वनकॉइनला दाेन वर्षे पूर्ण झाल्याच्या ‘मुहूर्तावर’ एक जंगी कार्यक्रमही तिनं ठेवला. या कार्यक्रमाला मोठमोठ्या प्रतिष्ठित लोकांना तर तिनं व्यासपीठावर विराजमान केलंच, पण कार्यक्रमही असा जंगी केला, की लोकांच्या डाेळ्यांचं पारणं फिटलं. लोकांचा ‘वनकॉइन’वरचा विश्वास आणखी वाढला आणि आपल्या खिशातले राहिलेले पैसेही लोकांनी तिला पटापट काढून दिले. थोड्याच दिवसांत लोकांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. आपल्याला पैसे परत मिळत नाहीत, आपले पैसे बुडाले, आपण फसलो, हे लक्षात आल्यानं काही लोकांनी तिच्यावर तक्रारी दाखल केल्या. आपलं ‘अवतार कार्य’ आता संपलं हे रुजाच्याही लक्षात आलं आणि लोकांचे पैसे घेऊन ती ‘अंतर्धान’ पावली! पण या काळात तिनं लोकांच्या किती पैशाला चंदन लावलं? ही रक्कम होती, ४ अब्ज डॉलर्स म्हणजे ३१ हजार कोटी रुपये! 

रुजाचा पत्ता द्या, मालामाल व्हा! हे पैसे घेऊन २०१७ पासून रुजा गायब झाली, ती आजवर कोणालाही सापडलेली नाही. ‘एफबीआय’नं तर तिला पकडून देणाऱ्यास किंवा तिचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास तब्बल एक लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस देऊ केलं आहे. सर्वसामान्यांनाही असे ‘हनी ट्रॅप’ लक्षात यावेत म्हणूनच आम्ही ही बक्षीस योजना जाहीर केली आहे, असं एफबीआयचं म्हणणं आहे.

 

टॅग्स :क्रिप्टोकरन्सीगुन्हेगारीव्यवसाय