Join us
Daily Top 2Weekly Top 5

११५ डॉलर्स प्रति बॅरल पर्यंत पोहोचलं कच्चं तेल; पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारचा प्लॅन काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:21 IST

Crude Oil Price Hike: आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवार, ९ मार्च रोजी कच्च्या तेलाच्या किमतींनी २०२२ नंतर पहिल्यांदाच ११५ डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. पाहा काय आहे सरकारचा प्लॅन.

Crude Oil Price Hike: आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवार, ९ मार्च रोजी कच्च्या तेलाच्या किमतींनी २०२२ नंतर पहिल्यांदाच ११५ डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि 'होरमुझ सामुद्रधुनी' मधून होणारा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. जागतिक ऊर्जा बाजारात माजलेल्या या हाहाकारामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडर अचानक ६० रुपयांनी महागल्यामुळे इंधनाचे दर वाढण्याची भीती अधिकच गडद झाली आहे.

सरकारचा दिलासादायक निर्णय: तूर्तास दरवाढ नाही

एक दिलासादायक बाब म्हणजे, भारत सरकार सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्याच्या विचारात नाही. 'CNBC TV18' च्या अहवालानुसार, सरकारी सूत्रांनी माहिती दिली आहे की सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या पंपांवरील किमती वाढवल्या जाणार नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे तेल कंपन्यांना सध्या कमी नफ्यावर काम करावं लागू शकते. आंतरराष्ट्रीय किमतींमधील या दरवाढीचा सुरुवातीचा फटका सरकारी तेल विपणन कंपन्यांनी स्वतः सोसावा, असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजेच, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या खर्चाचा बोजा तूर्तास सर्वसामान्यांच्या खिशावर टाकला जाणार नाही.

Meesho च्या शेअरमध्ये जोरदार विक्री, १०% पर्यंत आपटला स्टॉक, दोन कारणांमुळे लागला मोठा झटका

तेल कंपन्यांच्या नफ्यावर आणि मार्जिनवर दबाव

सरकारची अशी इच्छा आहे की तेल कंपन्यांनी आपल्या नफ्याचे मार्जिन कमी करून किमती स्थिर ठेवाव्यात. साधारणपणे भारतात इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय दरांनुसार दररोज ठरवले जातात, परंतु अपवादात्मक परिस्थितीत सरकार हस्तक्षेप करते. आता कच्च्या तेलाचा दर १०० डॉलरच्या पार गेल्यामुळे जर पंपांवरील किमती वाढवल्या नाहीत, तर इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या कंपन्यांच्या 'मार्केटिंग मार्जिन'वर मोठा दबाव येईल. या कंपन्यांना काही काळ कमी नफा किंवा संभाव्य तोटा सहन करून काम करावं लागू शकतं.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची विक्रमी उसळी

आज 'वेस्ट टेक्सस इंटरमीडिएट' (WTI) कच्चे तेल १७.४% च्या प्रचंड वाढीसह १०६.८ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. त्याच वेळी, जागतिक मानक मानलं जाणारं 'ब्रेंट क्रूड' (Brent Crude) देखील १८% नं वधारून ११५ डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवर पोहोचलं. किमतींमधील या वेगवान वाढीमुळे सोमवारच्या सत्रात भारतासह आशियाई शेअर बाजारांमध्येही घसरण नोंदवण्यात आली. ऊर्जा संकटामुळे निर्माण होणाऱ्या महागाईच्या धोक्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Crude oil at $115; Will Petrol, Diesel Prices Rise?

Web Summary : Crude oil hits $115, raising petrol and diesel price concerns. Government intervention aims to shield consumers from immediate price hikes. Oil companies may face margin pressures.
टॅग्स :पेट्रोलडिझेलखनिज तेल