Join us
Daily Top 2Weekly Top 5

रशियाऐवजी भारत 'या' मुस्लिम देशातून कच्चे तेल का मागवतोय? जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 16:20 IST

Crude Oil Import: रशियाकडून भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत घट झाली आहे.

Crude Oil Import :रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून जगभरातील अनेक देशांनी रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. पण, भारताने रशियातून कच्चे तेल आयात करणे सुरू ठेवले होते, मात्र आता यात घट झाली आहे. डिसेंबर महिन्यात रशियाकडून कच्च्या तेलाची आयात 13.2 टक्क्यांनी घटून 1.39 मिलियन बॅरल प्रतिदिन झाली आहे. तर नोव्हेंबरमध्ये हा आकडा 1.61 मिलियन बॅरल प्रतिदिन होता. लंडनस्थित कमोडिटी डेटा ॲनालिटिक्स प्रोव्हायडर व्होर्टेक्साच्या डेटावरून हे उघड झाले आहे.

पाच देश कच्च्या तेलाचे सर्वात मोठे पुरवठादार या कालावधीत देशाची एकूण कच्च्या तेलाची आयात दर महिन्याला सुमारे 4 टक्क्यांनी वाढून 4.46 मिलियन बॅरल प्रतिदिन झाली आहे, ज्यामध्ये भारताने रशियापेक्षा इराकमधून अधिक कच्चे तेल आयात केल्याचे समोर आले आहे.

व्होर्टेक्साचे बाजार विश्लेषक झेवियर तांग यांनी द फायनान्शिअल एक्सप्रेसला सांगितले की, डिसेंबरमध्ये जगातील विविध भागांतून ज्या देशांमधून कच्चे तेल आयात करण्यात आले त्यात रशिया, इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि अंगोला यांचा समावेश आहे. यापैकी अंगोला अमेरिकेला मागे टाकून कच्च्या तेलाचा पाचवा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे. रशियाकडून कच्चे तेल कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे, भारतातील रिफायनर्सनीे आफ्रिका आणि मध्यपूर्वेतून तेल आयात करण्यास सुरुवात केली आहे.

भारत, रशिया आणि सौदी अरेबियाकडून सर्वाधिक कच्च्या तेलाची आयात करतो, परंतु डिसेंबरमध्ये कच्च्या तेलाच्या आयातीत यूएई आणि इराकचा वाटा वाढला आहे. भारतातील कच्च्या तेलाच्या आयातीत इराकचा वाटा 23 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जो पूर्वी 16 टक्के होता. आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात इराकमधून आयात 48.3 टक्क्यांनी वाढून 1.03 मिलियन बॅरल प्रतिदिन झाली आहे. पण, मध्यपूर्वेच्या तुलनेत प्रति बॅरल सवलत दिल्यास कच्च्या तेलाच्या आयातीच्या बाबतीत भारत रशियाला प्राधान्य देत राहील.

 

टॅग्स :रशियाभारतखनिज तेल