Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशातील विमान इंधनाचा खप ५० टक्के घटला, पंधरा वर्षांतील नीचांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 07:51 IST

विशाल शिर्के -पिंपरी :  कोरोनाकाळात विमानसेवा विस्कळीत झाल्याने   विमान इंधनाच्या (एव्हिएशन टर्बान फ्युएल) मागणीत २०१९-२०च्या तुलनेत निम्म्याने ...

विशाल शिर्के -

पिंपरी :  कोरोनाकाळात विमानसेवा विस्कळीत झाल्याने  विमान इंधनाच्या (एव्हिएशन टर्बान फ्युएल) मागणीत २०१९-२०च्या तुलनेत निम्म्याने घट झाली आहे. मार्च २०२१ अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात विमान इंधनाची मागणी ४२.९४ लाख टनांनी घटली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एप्रिल ते मार्च २०२१च्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च २०२० मध्ये टाळेबंदी जाहीर करण्यात आली. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवा पूर्णतः बंद होती. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. जुलै २०२० पासून निर्बंध काही प्रमाणात शिथिल होण्यास सुरुवात झाली. मात्र मार्च २०२१ अखेरपर्यंत इंधन मागणीने दरमहा सरासरी गाठली नाही. दरमहा सरासरी सहा ते सात लाख टन विमान इंधनाची आवश्यकता असते. टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर एप्रिल २०२० मध्ये इंधनाची मासिक मागणी ५५ हजार टनांपर्यंत घसरली. त्यात मार्च २०२१ पर्यंत चार लाख ७५ हजार टनांपर्यंत वाढ झाली. देशात २०१९-२०मध्ये ७९.९९ लाख टन इंधनाचा खप झाला होता. मार्चअखेर संपलेल्या (२०२०-२१) आर्थिक वर्षात इंधनाची मागणी ३७.०५ लाख टनांपर्यंत खाली घसरली. अगदी २००५-०६ सालीदेखील विमान इंधनाचा वार्षिक खप ३२.९९ लाख टन होता. प्रवासी आणि मालवाहतूक सेवा विस्तारत असल्याने दरवर्षी विमान इंधनाची मागणी वाढत आहे. कोरोनामुळे विमाने जमिनीवरच राहिल्याने पंधरा वर्षांपूर्वीच्या मागणी इतकाही इंधन खप गेल्या आर्थिक वर्षात झाला नाही. 

एप्रिल महिन्यातील इंधन खप चार लाख टनांवर मार्च २०२१ मध्ये ४.७५ लाख टन असलेला विमान इंधनाचा खप एप्रिलमध्ये ४.०९ लाख टनांपर्यंत घसरला आहे. एप्रिल २०२० मध्ये ५५ हजार टन, एप्रिल २०१९ मध्ये ६.४६ आणि एप्रिल २०१८ मध्ये ७.१९ लाख टन इंधनाचा खप होता.  

विमान इंधनाचा खप साल             इंधन खप (लाख टन) २०११-        १२ ५५.३६ २०१२-१३         ५२.७१ २०१३-१४         ५५.०५२०१४-१५         ५७.२३ २०१५-१६         ६२.६२ २०१६-१७         ६९.९८ २०१७-१८         ७६.३३ २०१८-१९         ८३.०० २०१९-२०         ७९.९९ २०२०-२१         ३७.०५ 

टॅग्स :विमानकोरोना वायरस बातम्या