Join us

१३० काेटींच्या देशात केवळ २ टक्के भरतात प्राप्तीकर; ४ टक्के श्रीमंत शेतकऱ्यांना कर लावला तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 05:37 IST

परदेशवारी करणाऱ्यांचीही संख्या वाढली, उत्पन्न लपविणारेच देशात जास्त

नवी दिल्ली : भारत हा १३० काेटी लाेकसंख्येचा देश आहे; मात्र केवळ २ टक्के नागरिक प्राप्तीकर भरतात. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या माहितीनुसार २०१८-१९ या वर्षात केवळ दीड काेटी नागरिकांनीच प्राप्तीकर भरला. प्राप्तीकर भरणाऱ्यांची संख्या एकीकडे कमी आहे. तर, दुसरीकडे परदेश दाैरे करणारे तसेच महागड्या मालमत्ता खरेदी करणाऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. 

केंद्र सरकारने यंदाची आकडेवारी जारी केलेली नाही; मात्र ५.७८ काेटी नागरिकांनी प्राप्तीकर विवरण भरले आहे. त्यापैकी १.०३ काेटी नागरिकांनी २.५ लाखांहून कमी उत्पन्न दाखविले आहे. तर ३.२९ काेटी नागरिकांनी २.५ ते ५ लाखांपर्यंत उत्पन्न दाखविले आहे. नव्या तरतुदींनुसार ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तीकरातून संपूर्णपणे सूट दिली आहे. दाेन वर्षांपूर्वीच्या आकडेवारीनुसार १.४६ काेटी नागरिकांनी प्राप्तीकर भरला हाेता. त्यापैकी ४७ लाख वैयक्तिक करदात्यांनी वार्षिक १० लाखांहून अधिक उत्पन्न दाखविले हाेते. तर १ काेटी करदात्यांनी ५ ते १० लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न दाखविले हाेते. प्रत्यक्ष करातून मिळणाऱ्या महसुलात ९८ टक्के नागरिकांचे याेगदान नाही. विकसित देशांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक नागरिक प्राप्तीकर भरतात.  सुमारे ३ काेटी नागरिकांनी परदेशवारी केल्याचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी एका कार्यक्रमात सांगितले हाेते. पर्यटन मंत्रालयाच्या माहितीनुसार, २०१९ मध्ये २.६९ काेटी भारतीयांनी परदेश प्रवास केला हाेता; मात्र देशात केवळ दीड काेटी लाेकांनीच प्राप्तीकर भरला. देशात लक्झरी कारची विक्री वाढत आहे. ही विक्री २०२१ मध्ये १६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात एकूण २७ लाख कार विक्री झाली. काेराेना काळातही २०२० मध्ये १ लाख ८२ हजारांहून अधिक घरांची विक्री झाली हाेती. तर तिसऱ्या तिमाहीत घरांची विक्री दुप्पट झाली हाेती.

शेतीतून मिळणारे उत्पन्न करमुक्तशेतीतून प्राप्त हाेणारे उत्पन्न करमुक्त आहे.  गरीब शेतकऱ्यांसाठी हे याेग्य आहे; मात्र मर्सिडीजमधून फिरणारे आणि काेट्यवधींचे उत्पन्न प्राप्त करणारेही शेतकरी आहेत. शेतीतून झालेले उत्पन्न दाखवून अनेकांनी काळा पैसा पांढरा केला जाताे, अशी शंकाही सरकारने व्यक्त केली आहे. देशातील ४ टक्के श्रीमंत शेतकऱ्यांना प्राप्तीकराच्या कक्षेत आणल्यास २५ हजार काेटींचा अतिरिक्त महसूल प्राप्त हाेऊ शकताे.

टॅग्स :शेतकरीइन्कम टॅक्स