Join us

CoronaVirus: राज्यातील स्टील उद्योगाला सवलतींची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 03:14 IST

असोसिएशनची मागणी; उद्योजकांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयुक्तांशी संवाद

जालना : कोरोनामुळे सर्वच उद्योग अडचणीत आले आहेत. स्टील उद्योगाला उभारी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने सवलती द्याव्यात, अशी मागणी स्टील उद्योजकांनी केली आहे. तसा प्रस्ताव गुरुवारी उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत दिला.महाराष्ट्र स्टील मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष योगेश मानधनी, सचिव कमल गुप्ता यांनी डॉ. कांबळे यांच्यासमवेत दूरभाष बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत विजेच्या दरात सवलत देणे, स्थिर आकाराची अंमलबजावणी सहा महिने लांबविणे, बँकांनी कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे, झोपडपट्टी परिसरात आरसीसीची घरे बांधण्यासाठी प्रकल्प हाती घेणे आदी मागण्यांचे प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यासमोर मांडण्याबाबत चर्चा झाली. यावेळी पंकज अग्रवाल, दिनेश अग्रवाल, अनिल गोयल, आशिष भाला, नितीन काबरा, नागपूर येथील संजय अग्रवाल, शाम मुंदडा, पुणे येथील विकास गोयल, विकास गुप्ता, मुंबई येथील श्रवण अग्रवाल, कमल गुप्ता, सिंघानिया, उपाध्यक्ष विपीन अग्रवाल, अमित गर्ग, आशिष गुप्ता यांच्यासह ४५ उद्योजक सहभागी झाले होते. उद्योग नव्याने सुरू करण्यासाठी सरकारने ज्या जाचक अटी घातल्या आहेत. त्याचा पुर्नविचार झाला पाहिजे, अशी मागणी उद्योजकांनी केली. योगेश मानधनी यांनी उद्योगाला संजीवनी देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगितले.उद्योजकांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य असून, त्यांना सर्व ती मदत देण्यास तयार आहोत. कोरोनाचा लढा हळूहळू संपणार आहे. त्यामुळे लगेचच अर्थव्यवस्था आणि उद्योग पूर्वपदावर येतील, याची शक्यता कमी आहे. उद्योजकांनी अटीशर्थीच्या अधीन राहून उद्योग चालवावेत. या प्रस्तावावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंंत्र्यांशी चर्चा करू.-डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त, उद्योग विकास विभागसरकार पायाभूत सुविधा विकासासाठी प्राधान्य देत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्याचा फटका स्टील उद्योगालाही बसला आहे. सवलती आणि सुविधांवरच भवितव्य अवलंबून आहे. सरकारकडून सहकार्य मिळेल, अशी आशा आहे.- योगेश मानधनी, राज्याध्यक्ष, स्टील मॅन्युफॅक्चरिंंग असोसिएशन

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस