Join us
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम साहित्य महागले; घरांच्या किमतीही वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 05:45 IST

बांधकामाशी निगडित साहित्याचे दर वाढत असल्यामुळे नजीकच्या काळात घरांच्या किमतीही गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सिमेंट टनामागे ५००, तर लोखंड ७५० रुपयांनी महागले आहे.

मुंबई : बांधकामाशी निगडित साहित्याचे दर वाढत असल्यामुळे नजीकच्या काळात घरांच्या किमतीही गगनाला भिडण्याची शक्यता आहे. सिमेंट टनामागे ५००, तर लोखंड ७५० रुपयांनी महागले आहे. सिमेंट दरातील वाढीला देशांतर्गत कंपन्यांचा निर्णय, तर लोखंडच्या किमतीतील वाढीला आंतरराष्ट्रीय बाजार कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंट व लोखंड या दोन अत्यावश्यक घटकांचा बाजार नेहमीच कमालीचा अस्थिर असतो. मागील आॅक्टोबरपासून स्थिर असलेले सिमेंट आणि लोखंडाचे दर वाढताना दिसत आहेत. देशातील प्रमुख सिमेंट उत्पादक हे दक्षिण भारतातील आहेत. दक्षिणेतील उत्पादकांनी किंमत वाढविण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम देशभरातील बाजारावर होतो. यानुसार कंपन्यानी आता मार्चअखेर जवळ आल्याने नफा वाढविण्याच्या हेतूने किमतीत वाढ केली आहे. मागणीअभावी या कंपन्यांची विक्री घटत आहे. परिणामी नफाही कमी होत आहे. नफा घटला की त्याचा परिणाम कंपन्यांच्या मानांकनांवर होतो. मानांकन घटले की विदेशातील मागणी कमी होते. यामुळेच या कंपन्यांनी सिमेंटच्या ५० किलोच्या प्रति पोत्यामागे २० ते २५ रुपये वाढ केली आहे. यामुळे आता देशभरात सिमेंटच्या एका पोत्याची सरासरी किंमत ३२५ रुपयांवर पोहोचली आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर लोखंड जवळपास ४० डॉलर प्रति टन महाग झाले आहे. ब्राझिलमधील लोह खनिजाचे उत्पादन स्थानिक भौगोलिक कारणे व एका मोठ्या अपघातामुळे घटले आहे. परिणामी येत्या काळात लोह खनिजाची आयात महागण्याची चिन्हे आहेत.भारतात प्रति माणशी लोखंडाचा वापर वाढतोय. त्यामुळेच लोह खनिजाची आयातही वाढत चालली आहे. सध्या लोह खनिज उत्पादन व मागणी यामध्ये फार तफावत दिसत नसली तरी मागणीचा चढता आलेख लक्षात घेऊन कंपन्यांनी दर वाढवले आहेत.- मितेश प्रजापती, सरचिटणीस स्टील युजर्स फेडरेशन आॅफ इंडिया

टॅग्स :घर