Join us  

सत्तरीपार स्वातंत्र्याला रुपयाचाही सलाम...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 1:10 PM

डाॅलरच्या तुलनेत रुपयाची मंगळवारीही घसरण सुरुच, रुपया 70.07 वर पोहोचला

मुंबई : डॉलरसमोर भारतीय रुपयाने ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली असून आज, मंगळवारी पाच पैशांची घसरण नोंदवत 70.07 रुपयांवर घसरला आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांनी टीकेचा भडीमार सुरु केला आहे. महत्वाचे म्हणजे, देशाच्या स्वातंत्र्याला 71 वर्षे झाली असताना रुपयाही सत्तरीपार पोहोचल्याने टीकेला आणखीनच धार चढली आहे.

गेल्या 70 वर्षांत काँगेसने काही केले नसल्याची नेहमीच टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने आज शरसंधान साधले. अखेर मोदी सरकारने असे काही करून दाखवलेच, जे आम्ही 70 वर्षांत करू शकलो नव्हतो, असे ट्विट केले आहे. तसेच मोदी यांनी काँग्रेस सरकारच्या काळात रुपया 67 वर पोहोचल्याने देशाची इभ्रत खाली गेल्याची टीका केली होती. यावरही काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी टीका केली. गतीमंद झालेली अर्थव्यवस्था, घसरत चाललेला रुपया, सांगा मोदी आता कोण देशाचा सन्मान घालवत आहे, अशा शब्दांत शरसंधान साधले.

आपनेही टीका करताना जनता झेलतेय मार, रुपया पोहोचलाय सत्तरी पार, आता तरी जागे व्हा मोदी सरकार, असे ट्विट केले आहे. यासोबत #IndianEcononomyIsDying हा हॅशटॅगही केला आहे.

या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही ट्विटरवर केंद्र सरकारवर टीका केली आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा एका रुपयाला एक डॉलर असे प्रमाण होते. आज स्वातंत्र्य मिळून 71 वर्षे झाली. म्हणजेच प्रत्येक वर्षाला एक रुपया असा रुपया घसरला आहे, अशा शब्दांत टीका केली.

टॅग्स :अर्थव्यवस्थाभारतभारतीय रिझर्व्ह बँकस्वातंत्र्य दिवसआदित्य ठाकरेकाँग्रेसआप