Join us
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक : देशात महागाई वाढली, उद्योगांची वाढ मंदावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 21:14 IST

देशाच्या आर्थिक आघाडीवर मंदीचे सावट असतानाच आर्थिक क्षेत्रातून अजून एक चिंताजनक बातमी आली आहे.

नवी दिल्ली - देशाच्या आर्थिक आघाडीवर मंदीचे सावट असतानाच आर्थिक क्षेत्रातून अजून एक चिंताजनक बातमी आली आहे. जुलै महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन वाढीचा दर घटून ४.३ टक्क्यांवर आले आहे. तसेच खाद्य पदार्थांची महागाई वाढल्याने ऑगस्ट महिन्यात  किरकोळ महागाईचा दर वाढून ३.२१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. औद्योगिक उत्पादन संकेतांक (आयआयपी) च्या आधारावर मोजण्यात येणाऱ्या औद्योगिक उप्तादन वृद्धी दरामध्ये ही घट उत्पादन क्षेत्रातील निराशाजनक कामगिरीमुळे झाली आहे. दुसरीकडे खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने ऑगस्ट महिन्यामध्ये किरकोळ महागाईचा दर ३.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या महिन्यात हा महागाईचा दर ३.१५ टक्के इतका होता. मात्र महागाईच्या दरात वाढ होत असली तरी तो रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या दरापेक्षा कमी आहे.  दरम्यान खाणकाम क्षेत्रातील वाढीचा दर जुलैमध्ये ४.९ टक्के इतका होता. तर गतवर्षी याच काळात हा दर ३.४ टक्के होता. या कालावधीत विद्युत क्षेत्रातील वाढीचा दर ४.८ टक्के राहिला. २०१८ मध्ये या काळात तो ६.६ टक्क्यांवर होता. अन्नधान्याच्या महागाईचा दर जुलै महिन्यात २.३६ टक्के होता. तो वाढून ऑगस्टमध्ये २.९९ टक्के झाला. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात किरकोळ बाजारातील महागाईचा दर ३.६९ टक्के होता. दरम्यान, केंद्र सरकारने महागाईचा दर चार टक्क्याच्या चौकटीत ठेवण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेला दिला आहे.  

टॅग्स :महागाईअर्थव्यवस्थाभारत