Join us
Daily Top 2Weekly Top 5

Chinu Kala : एकेकाळी घरोघरी जाऊन चाकू विकले, आता करतायेत करोडोंची कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 13:04 IST

Chinu Kala : वयाच्या 15 व्या वर्षी त्यांना घर सोडावे लागले. त्या रेल्वे स्टेशनवर झोपल्या. घरोघरी जाऊन चाकू-सुऱ्या विकल्या. अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी आपले ध्येय कायम ठेवले.

नवी दिल्ली : जर एखाद्या व्यक्तीने हिंमत हारली नाही तर जगातील सर्वात कठीण प्रसंगही त्याचा पराभव करू शकत नाहीत. याचे जिवंत उदाहरण म्हणजे रुबंस अॅक्सेसरीज या स्टार्टअपच्या संस्थापक चिनू काला. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांना घर सोडावे लागले. त्या रेल्वे स्टेशनवर झोपल्या. घरोघरी जाऊन चाकू-सुऱ्या विकल्या. अशा बिकट परिस्थितीतही त्यांनी आपले ध्येय कायम ठेवले. त्याचाच परिणाम म्हणजे आज त्या 40 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या कंपनीच्या मालकीन आहेत. चिनू आजही दररोज 15 तास काम करतात. भारतीय दागिन्यांच्या बाजारपेठेत आपल्या ब्रँडचा 25 टक्के हिस्सा बनवण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

अलीकडेच चिनू काला आपल्या पतीसोबत शार्क टँक इंडिया शोमध्ये दिसल्या. चिनू यांच्या संघर्षाची कहाणी ऐकून शार्क टँक इंडियाचे जज सुद्धा प्रभावित झाले. चिनू यांना आपल्या स्टार्टअपसाठी शार्क टँक इंडियाकडून दीड कोटी रुपयांचा निधी मिळवण्यात यश आले. शार्क टँक इंडियाच्या नमिता थापरने चिनू यांचे कौतुक करताना सांगितले की, "आम्ही मास्टर्सकडून कौशल्ये शिकलो आहोत, तुम्ही ते परिस्थितीतून शिकलात."

चिनू काला सांगतात की, घरातील वातावरण त्यांच्यासाठी खूप वाईट होते. याला कंटाळून त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षी घर सोडले. काही रात्री त्यांनी स्टेशनवर काढल्या. घरातून बाहेर पडल्यावर त्याच्याकडे फक्त 300 रुपये आणि काही कपडे होते. मग त्यांना एका ठिकाणी राहायला जागा मिळाली. तसेच, त्यांना घरोघरी चाकू विकण्याचे काम मिळाले. त्या दिवसाला फक्त 20 रुपये कमवत होत्या. हे काम खूप अवघड होते. 100 दरवाजे ठोठावल्यावर त्यांचा माल फक्त 2-3 ठिकाणी विकला जायचा. यानंतर चिनू यांनी सायंकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम केले. त्या कोणत्याही कामाला लहान न मानता पुढे जात राहिल्या.

मिसेस इंडिया स्पर्धेने आयुष्य बदलले2004 मध्ये त्यांनी अमित कालासोबत लग्न झाले. दोन वर्षांनंतर त्या मिसेस इंडिया स्पर्धेत भाग घेतला. त्या मिसेस इंडियाच्या शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचल्या. त्यानंतर त्याचे आयुष्य सोपे झाले. जेव्हा त्या मॉडेल बनल्या होत्या, तेव्हा त्या फॅशन इंडस्ट्रीत चांगल्या ओळखल्या जाऊ लागल्या. पण, त्यांनी कधीही मॉडेलिंगला आपले करिअर मानले नाही. फॅशन ज्वेलरीच्या बाबतीत काहीतरी करण्याचा विचार त्यांनी केला.

2014 मध्ये लाँच केले रुबंस अॅक्सेसरीजचिनू काला यांनी काम करून जे काही पैसे वाचवले, ते त्यांनी व्यवसाय उभारण्यासाठी लावले. त्यांनी बंगळुरूमधील एका मॉलमध्ये फक्त 6*6 जागेत आपला स्टॉल सुरू केला. काही वेळातच त्याची विक्री वाढू लागली. दोन वर्षांत त्याची विक्री 56 लाखांपर्यंत वाढली. कोरोनाच्या काळात त्यांनी आपले दागिने ऑनलाइन विकायला सुरुवात केली. यामुळे त्याचा ब्रँड खूप प्रसिद्ध झाला. आज रुबंस अॅक्सेसरीजची वार्षिक उलाढाल 40 कोटींच्या पुढे गेली आहे.

टॅग्स :व्यवसायजरा हटके