चीनमध्ये पगार न मिळाल्यानं कामगारांचं आंदोलन वाढत असून आता ते रस्त्यावर उतरत आहेत. आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं चिनी वस्तूंवर लादलेल्या शुल्कामुळे कारखाने बंद पडत असून, त्याचा फटका मोठ्या संख्येनं कामगारांना बसत आहे. रेडिओ फ्री एशियानं (आरएफए) दिलेल्या वृत्तानुसार, हुनान प्रांतातील दाओ काउंटीपासून ते सिचुआनमधील सुईनिंग आणि इनर मंगोलियामधील टोंगलियाओ पर्यंत मोठ्या संख्येनं कर्मचारी थकित वेतनाबद्दल आपल्या तक्रारी व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसरीकडे त्यांनी अमेरिकेच्या शुल्कामुळे बंद करण्यास भाग पाडलं जात असलेल्या कारखान्यांमधील अन्यायकारक छाटणीचा निषेधही केलाय.
१.६ कोटी नोकऱ्यांना टांगती तलवार
आरएफएच्या रिपोर्टनुसार, कामगारांनी असा दावा केलाय की फ्लेक्सिबल सर्किट बोर्ड तयार करणाऱ्या सिचुआनस्थित कंपनीनं वर्षाच्या सुरुवातीपासून त्यांचं वेतन दिलं नाही आणि जून २०२३ पासून सुमारे दोन वर्षे सामाजिक सुरक्षेचे लाभ देखील थांबवले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी आयातीवर १४५ टक्के शुल्क लादल्यामुळे चीनमधील विविध क्षेत्रातील किमान एक कोटी ६० लाख नोकऱ्या धोक्यात आल्याचा अंदाज अमेरिकन गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सच्या तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
ट्रम्प प्रशासनानं वाढवलेल्या शुल्कामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल, मंद आर्थिक विकासामुळे कामगार बाजारावर, विशेषत: निर्याताभिमुख उद्योगांवर आणखी दबाव येण्याचा धोका असल्याचा त्यांचा अंदाज आहे.
दाखल केली तक्रार
वायव्य शांक्सी प्रांतातील शियान येथील तुआनजी मधील डझनाहून अधिक स्थलांतरित मजुरांनी फेब्रुवारी २०२५ पासून वेतन मिळाले नसल्याचं सांगत स्थानिक प्रकल्प कार्यालयात चिंता व्यक्त केली होती. २४ एप्रिल रोजी दाओ काउंटीतील गुआंगझिन स्पोर्ट्स गुड्सच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी योग्य मोबदला किंवा सामाजिक सुरक्षेचा लाभ न देता कंपनीचा कारखाना बंद केल्यानं संप पुकारला होता.