China Growth : भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनची सध्या आर्थिक आघाडीवर चांगलीच कोंडी झाली आहे! अमेरिकेशी व्यापार चर्चा होऊनही, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या अतिरिक्त शुल्काचा थेट परिणाम जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनवर दिसून येत आहे. यामुळे चीनचे कारखाना उत्पादन गेल्या सहा महिन्यांतील सर्वात कमी पातळीवर घसरले आहे, ज्यामुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. मात्र, किरकोळ विक्रीत थोडीशी वाढ झाल्याने बीजिंगला काहीसा दिलासा मिळाला आहे.
कारखाना उत्पादन ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवरराष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चीनच्या औद्योगिक उत्पादनात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत फक्त ५.८ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात ही वाढ ६.१ टक्के होती. नोव्हेंबर २०२३ नंतरची ही आतापर्यंतची सर्वात मंद गती आहे.
चीनच्या कारखाना वाढीतील ही घसरण अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे चीनची अर्थव्यवस्था आधीच कठीण परिस्थितीतून जात आहे. विशेषतः, चीनमधील मालमत्ता क्षेत्र (Property Sector) पूर्णपणे डबघाईला आले आहे. घरांच्या किमती प्रचंड घसरल्या आहेत आणि नजीकच्या भविष्यात यातून सावरण्याची कोणतीही आशा दिसत नाही.
किरकोळ विक्रीत वाढ, पण चिंतेचे ढग कायमया नकारात्मक औद्योगिक आकडेवारीच्या तुलनेत, चीनच्या किरकोळ विक्रीत मात्र वाढ दिसून आली आहे. किरकोळ विक्रीत ६.४ टक्के वाढ झाली आहे, जी एप्रिल महिन्यात ५.१ टक्के होती. डिसेंबर २०२३ नंतरची ही सर्वात जलद वाढ मानली जात आहे. तज्ज्ञांना ती ५.० टक्के दराने वाढेल अशी अपेक्षा होती. हे आकडे एका बाजूला औद्योगिक क्षेत्रातील मंदी दर्शवतात, तर दुसऱ्या बाजूला देशांतर्गत वापरामध्ये सुधारणा झाल्याचे आणि आर्थिक वाढीचे संकेत देतात.
चीनला धक्का का बसला?२ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केल्यानंतर चीनला मोठा धक्का बसला. अमेरिकेने इतर देशांवरील टॅरिफमध्ये ९० दिवसांची सूट दिली होती, तर चीनवरील टॅरिफमध्ये वाढ करण्यात आली होती. दोन्ही देशांमधील 'टॅरिफ वॉर' आणि ऍपलसारख्या मोठ्या कंपन्यांनी चीनमधील त्यांचे कामकाज भारतात हलवण्याचा निर्णय हा चीनसाठी एक मोठा धक्का ठरला.
वाचा - व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?
जरी अलीकडे दोन्ही देशांमधील व्यापार चर्चेनंतर तणाव कमी झाला असला तरी, ट्रम्प टॅरिफने चीनच्या अर्थव्यवस्थेवर खोलवर परिणाम केला आहे, ज्यातून सावरण्यासाठी त्यांना आणखी काही काळ लागू शकतो.