ट्रेड टेन्शन कमी करण्यासाठी अमेरिका आणि चीन यांच्यातील चर्चा रविवारी पुन्हा सुरू झाली. या चर्चेचा भारतासह जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, दोन्ही देशांमधील चर्चेबाबत वेगवेगळी मतं आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर खूप चांगली प्रगती होत असल्याचं म्हणत एक नवी सुरुवात केली जाऊ शकते असं म्हटलं. तर दुसरीकडे मूलभूत तत्त्वांशी तडजोड करणारा किंवा जागतिक समानतेच्या व्यापक उद्दिष्टाला धक्का पोहोचवणारा कोणताही प्रस्ताव चीन ठामपणे फेटाळणार असल्याचं चीनच्या सरकारी एजन्सीनं म्हटलं. अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढता व्यापार तणाव कमी करणं हा जिनिव्हा येथील या चर्चेचा उद्देश आहे.
रविवारी सकाळी पुन्हा चर्चेची सुरुवात झाली. तत्पूर्वी शनिवारी दोन्ही पक्षांची भेट झाली होती. चर्चेनंतर दोघांनीही माध्यमांशी संवाद साधला नाही. अमेरिका-चीनमध्ये व्यापारयुद्ध सुरू असताना ही चर्चा होत आहे. त्यामुळे चीनमधून माल घेऊन अनेक जहाजे बंदरांवर उभी आहेत. परंतु, त्यांच्याकडून माल उतरवला जात नाही. दराबाबत अंतिम निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय.
ट्रम्प आणि चीनमध्ये मतभेद
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर खूप चांगली प्रगती होत आहे, असं म्हटलं. मात्र, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनीही पहिल्या दिवशी फारशी माहिती दिली नाही. दोन अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर रविवारी सकाळी पुन्हा चर्चा सुरू झाल्याचं म्हटलं. चीनच्या शिन्हुआ वृत्तसंस्थेनं आपल्या अग्रलेखात, चर्चा हा सतत दबाव किंवा बळजबरीचं निमित्त असू नये, मूलभूत तत्त्वांशी तडजोड करणारा किंवा जागतिक समानतेच्या व्यापक उद्दिष्टाला धक्का पोहोचवणारा कोणताही प्रस्ताव चीन ठामपणे फेटाळणार असल्याचं म्हटलंय.
गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी चीनवरील शुल्क वाढवून १४५ टक्के केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननंही अमेरिकन वस्तूंवर १२५ टक्के शुल्क लादलं. इतके जास्त शुल्क लादणे म्हणजे दोन्ही देश एकमेकांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकत आहेत. यामुळे ६६० अब्ज डॉलरपेक्षा अधिकच्या व्यापारावर परिणाम होत आहे. तर दुसरीकडे चर्चा सुरू होण्यापूर्वीच ट्रम्प यांनी अमेरिका चीनवरील शुल्क कमी करू शकते, असे संकेत दिले होते.
भारताला फायदा की तोटा?
या चर्चेवर भारतही लक्ष ठेवून आहे. अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार कराराचा भारतावर संमिश्र परिणाम होऊ शकतो. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी तणाव कमी झाला आणि शुल्क हटवलं तर चिनी निर्यातदारांना अमेरिकेच्या बाजारपेठेत पुन्हा आघाडी मिळू शकते. सध्या अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे काही अमेरिकन खरेदीदार भारतीय पुरवठादारांकडे वळले आहेत. हा करार झाल्यास चीन आपल्या तांत्रिक श्रेष्ठतेमुळे गमावलेली जागा परत मिळवू शकतो, ज्यामुळे भारतीय निर्यातदारांसाठी स्पर्धा वाढेल. अमेरिका-चीन व्यापार तणावाचा फायदा भारतानं काही भागात घेतला आहे. जर हा करार झाला तर भारताची या क्षेत्रांतील निर्यात कमी होऊ शकते कारण अमेरिकन खरेदीदार चीनकडे परत जाऊ शकतात. चिनी वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक झाल्या तर त्या इतर बाजारपेठांमध्येही अधिक आक्रमकपणे निर्यात करू शकतात, ज्यामुळे भारतीय देशांतर्गत उद्योगांवरील दबाव वाढू शकतो.
सकारात्मक बाबींचा विचार केला तर व्यापार करारामुळे जागतिक स्तरावर व्यावसायिक वातावरण सुधारू शकतं. यामुळे एकूण मागणीत वाढ होऊ शकते. भारताच्या निर्यातीलाही फायदा होऊ शकतो. दर कमी केल्यास जागतिक स्तरावर महागाई कमी होऊ शकते. त्याचा अप्रत्यक्ष फायदा भारतालाही होणार आहे. व्यापार करारांमुळे जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढू शकतो. यामुळे भारतासारख्या विकसनशील बाजारपेठांमध्ये भांडवलाचा ओघ वाढू शकतो.