Join us
Daily Top 2Weekly Top 5

रामगोपाल वर्मांसारखं जेलमध्ये जायचं नसेल तर चेक बाउन्सचा हा नियम माहिती हवा; किती होते शिक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:45 IST

Cheque Bounce Law : चेक बाऊन्स प्रकरणी न्यायालयाने चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अशी चूक तुमच्याकडून होऊ नये यासाठी तुम्हाला नियम माहिती पाहिजे.

Cheque Bounce Law : 'सत्या' या आयकॉनिक चित्रपटाला नुकतेच २५ वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांचे पुन्हा एकदा सर्वांनी कौतुक केलं. मात्र, हा कौतुकसोहळा फार दिवस चालला नाही. चेक बाऊन्सच्या प्रकरणात मुंबईतील एका न्यायालयाने दिग्दर्शक वर्मा यांना ३ महिन्याचा तुरुगवासाची शिक्षा सुनावली आहे. हे थोडे होते की काय म्हणून त्यांच्याविरुद्ध  अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. सहसा चेक बाऊन्स प्रकरणात जामीन मंजूर केला जातो. परंतु, येथे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. तुम्हीही चेकने आर्थिक व्यवहार करत असाल तर काही नियम तुम्हालाही माहित असणे आवश्यक आहे.

चेक बाउन्स कधी होतो?चेक बाउन्स कधी होतो? हे आधी समजून घेऊ. समजा तुम्ही एखाद्याला १ लाख रुपयांचा चेक (धनादेश) दिला असेल. त्यावर विशिष्ट तारीख लिहिली असेल. म्हणजे अमुक एका तारखेनंतर तुम्ही चेक बँकेत भरू शकता. अशा परिस्थितीत तुमच्या खात्यात १ लाख रुपयांची रक्कम नसेल किंवा त्यात एक रुपयाही कमी असली तरी अशा परिस्थितीत चेक बाउन्स होतो.

चेक बाउन्स झाल्यावर काय होते?निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट १९८१ च्या कलम १३८ अंतर्गत चेक बाऊन्स झाल्यास कारवाई केली जाते. अशा वेळी धनादेश जारी करणाऱ्याला नोटीस बजावली जाते. त्याला ठराविक वेळेत तो निकाली काढण्याची परवानगी दिली जाते. या कलमांतर्गत चेक जारी करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाईही केली जाऊ शकते. यामध्ये न्यायालय अटकेचे आदेशही देऊ शकते.

रामगोपाल वर्माच्या केसमध्ये काय झालं?चेक बाउन्स झाल्यास एफआयआर करण्याची आश्यकता नाही. चेक बाऊन्सचा कायदा स्पष्टपणे सांगतो की न्यायालयाच्या आदेशाशिवाय यामध्ये काहीही होत नाही. रामगोपाल वर्माच्या केसमध्ये न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतरही वर्मा यांनी दावा निकाली काढला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या अटकेचे वॉरंट काढले आहे.

चेक बाउन्स झाल्यास किती शिक्षा होते?

  • चेक बाउन्स कायद्यानुसार अशा केसेस ६ महिन्यांच्या आत निकाली काढणे आवश्यक आहे.
  • नवीन कायद्यानुसार, चेक बाउन्सची तक्रार बँक शाखा किंवा चेक जारी केलेल्या ठिकाणी करता येते. 
  • जर एखाद्याचा चेक पहिल्यांदाच बाउन्स झाला असेल, तर त्याला कोणत्याही खटल्याशिवाय तो निकाली काढण्याची संधी दिली जाते.
  • एखाद्या व्यक्तीचा चेक वारंवार बाउन्स झाल्यास त्याला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
  • चेक दोनदा किंवा त्याहून अधिक वेळा बाउन्स झाल्यास आरोपीला २ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि चेकच्या मूल्याच्या दुप्पट दंड होऊ शकतो.
टॅग्स :राम गोपाल वर्माबँकिंग क्षेत्रगुन्हेगारी