Join us

स्वस्त झाला रेल्वेचा गारेगार प्रवास!, भाडे झाले कमी; चादर, ब्लँकेटही मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 08:43 IST

रेल्वेने आदेश जारी करताना म्हटले आहे की, ज्या प्रवाशांनी आधीच ऑनलाइन किंवा ऑफलाइन तिकिटे बुक केली आहेत, त्यांना नवीन दरांनुसार पैसे परत केले जातील.

नवी दिल्ली : रेल्वेने जुनी प्रणाली लागू करत एसी ३-टियर इकॉनॉमी क्लासचे भाडे कमी केले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना ६० ते ७० रूपये कमी मोजावे लागतील. स्वस्त एसी प्रवास सेवा देण्यासाठी रेल्वेने सप्टेंबर २०२१ मध्ये एसी-३ इकॉनॉमी कोचची सेवा सुरू केली होती, मात्र, नोव्हेंबर २०२२ मध्ये एसी ३ टायरच्या मर्जरमुळे दोन्ही वर्गांचे भाडे समान झाले होते. 

रेल्वेने आदेश जारी करताना म्हटले आहे की, ज्या प्रवाशांनी आधीच ऑनलाइन किंवा ऑफलाइन तिकिटे बुक केली आहेत, त्यांना नवीन दरांनुसार पैसे परत केले जातील. रेल्वेने जेव्हा एसी-३ इकॉनॉमी कोचची सुरुवात केली, त्यावेळी प्रवाशांना चादर आणि ब्लँकेट दिले जात नव्हते, भाडे समान झाल्यानंतर ब्लँकेटही देण्यात आले. आता रेल्वेने जुनी प्रणाली पुन्हा लागू केली असली तरी चादर आणि ब्लँकेट देण्याची व्यवस्था सुरूच ठेवण्यात येणार असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे.

बर्थची रुंदी असते कमीरेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, सामान्य थर्ड एसी कोचमध्ये ७२ बर्थ (सीट्स) असतात, तर एसी-३ इकॉनॉमी कोचमध्ये ८० बर्थ असतात. एसी इकॉनॉमी कोचमधील बर्थची रुंदी सामान्य थर्ड एसी कोचच्या तुलनेत थोडी कमी असते, त्यामुळे हा फरक पडतो.

यामध्ये खास काय? एसी-३ इकॉनॉमी क्लासचे डबे ही स्लीपर क्लासची प्रगत आवृत्ती आहे. हे कोच स्लीपरपेक्षा अधिक आरामदायी, सुविधांनी सुसज्ज आहेत. स्लीपर कोचच्या तुलनेत कोचची मांडणी खूपच वेगळी आहे. त्यांचे फिनिशिंगही अतिशय आलिशान आहे. सस्पेंशन अधिक असल्याने यामध्ये झटके जाणवत नाहीत.

टॅग्स :रेल्वे