Join us

जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 19:06 IST

कनिष्ठ कर्मचाऱ्यासोबतच्या प्रेमसंबंधाच्या बातम्या समोर आल्यानंतर संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. 

अवघ्या जगाला कॉफी, चॉकलेट विकणाऱ्या नेस्ले कंपनीने सीईओला नोकरीवरून काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध समोर आल्याने कंपनीने सीईओ लॉरेंट फ्रीक्स यांना नारळ दिला आहे. वर्षभरापूर्वीच फ्रीक्स यांनी नेस्ले कंपनीत ही जबाबदारी घेतली होती. कनिष्ठ कर्मचाऱ्यासोबतच्या प्रेमसंबंधाच्या बातम्या समोर आल्यानंतर संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. 

प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ते धोरणाचे उल्लंघन मानले गेले. २०२४ मध्ये मार्क श्नायडर यांना काढून टाकण्यात आले होते. यानंतर फ्रीक यांनी सीईओ पद स्वीकारले होते. फ्रीक्स यांना काढून टाकल्यानंतर कंपनीने एक निवेदन जारी केल्याचे रॉयटर्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे. 

एका कनिष्ठ कर्मचाऱ्यासोबतच्या अघोषित प्रेमसंबंधाच्या चौकशीनंतर फ्रीक्स यांना काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीच्या नियमांनुसार हा प्रकार आचारसंहितेचे उल्लंघन करणारा होता. नेस्ले कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या अंतर्गत हॉटलाइनवर लॉरेंट फ्रिक्सच्या प्रकरणाबद्दल चिंता व्यक्त केली होती. परंतू चौकशीवेळी फ्रीक्स यांनी असे काही प्रेमसंबंध असल्याचे फेटाळले होते. सुरुवातीच्या चौकशीतही हे आरोप निराधार वाटले होते. परंतू, जेव्हा चौकशी पुढे सरकली तसे हे प्रकरण खरे असल्याचे समोर आले. कंपनीचे अध्यक्ष पॉल बुल्के यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. 

लॉरेंट फ्रीक्स यांच्या हकालपट्टीनंतर, नेस्लेने फिलिप नवरातिल यांना त्यांचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्त केले आहे.

 

टॅग्स :रिलेशनशिप