Nestle Crisis: जगातील सर्वात मोठी फूड कंपनी नेस्ले सध्या मोठ्या संकटातून जात आहे. एकेकाळी स्थिरता आणि विश्वासार्ह व्यवस्थापनासाठी प्रसिद्ध असलेली ही स्विस कंपनी आता नकारात्मक कारणांमुळे सतत चर्चेत येत आहे. ताज्या घडामोडीत, अध्यक्ष पॉल बुल्के यांनी नियोजित वेळेपूर्वी निवृत्तीची घोषणा केली आहे आणि फिलिप नवरातिल यांनी नवीन सीईओ म्हणून पदभार स्वीकारला आहे. अध्यक्षांच्या जागी आता पाब्लो इस्ला यांची नियुक्ती करण्यात आलीये. पाब्लो यापूर्वी झारा फॅशन ब्रँडचे मालक इंडिटेक्स एसएचे प्रमुख होते. नवरातिल आणि पाब्लो यांनी अशा वेळी कंपनीची सूत्रं हाती घेतली आहेत जेव्हा त्यांचे शेअर्स त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावरून ४० टक्क्यांहून अधिक घसरलेत.
कंपनीवरही मोठ्या कर्जाचा बोजा आहे. अधिग्रहण, शेअर बायबॅक आणि वारंवार लाभांश यामुळे कंपनीवरील कर्ज वाढलंय. एकेकाळी युनिलिव्हरसारख्या कंपन्यांहून प्रीमियमवर व्यापार करणारे नेस्लेचे शेअर्स आता त्यांच्या बरोबरीनं आलेत. २०२३ मध्ये कंपनीची विक्री वाढ दशकांतील विक्रमी नीचांकी पातळीवर होती. कमकुवत विक्रीची गती, वाढता खर्च, ग्राहकांची बदलती मागणी आणि चुकीचं व्यवस्थापन निर्णय यामुळे कंपनीची स्थिती आणखी बिकट झाली आहे.
सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
येताहेत संकटांवर संकट
२०२३ मध्ये जेव्हा कंपनीनं आपल्या ऍलर्जी उपचार व्यवसायाचे अवमूल्यन केलं तेव्हा कंपनीनं १.९ अब्ज फ्रँक गमावले. फ्रान्समध्ये, पेरियर मिनरल वॉटरला अयोग्य प्रक्रियेमुळे दंड ठोठावण्यात आला. कोविड -१९ नंतर महागाई वाढत असताना, ग्राहकांचा कल स्वस्त ब्रँडकडे आहे, ज्यामुळे नेस्लेची प्रीमियम किंमतीची रणनीती कमकुवत झाली आहे. या सर्व गोष्टींमुळे कंपनीच्या स्थिर आणि विश्वासार्ह गुंतवणूक या प्रतिमेला जबर धक्का बसलाय.
गेल्या दोन वर्षांत नेस्लेच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये सातत्याने बदल होत आहेत. २०२३ पर्यंत, मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क श्नायडर होते, ज्यांना त्यांच्या कामगिरीमुळे काढून टाकण्यात आलं. यानंतर लॉरेंट फ्रीक्स आले, ज्यांना अंतर्गत तक्रारी आणि अयोग्य संबंधांच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावा लागला. तीन वर्षांत तीन सीईओ बदलणं हा कोणत्याही मोठ्या कंपनीसाठी मोठा धक्का मानला जातो. यामुळे कंपनीच्या कारभारावर आणि उत्तराधिकार नियोजनावर गंभीर प्रश्न निर्माण झालेत.
घोटाळ्यामुळे प्रतिष्ठा हादरली
कंपनीच्या प्रतिमेला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा सीईओ लॉरेंट फ्रीक्स यांच्या वैयक्तिक संबंधांशी संबंधित प्रकरण समोर आले. त्यांनी कंपनीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं तपासात समोर आलं. सुरुवातीला त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला, पण दबाव वाढल्यानं त्यांना हटवावं लागलं. या वादानं नेस्लेसारख्या जुन्या आणि स्वच्छ इमेज असलेल्या कंपनीला टॅब्लॉइड बातम्यांचा एक भाग बनवलं.
नव्या चेहऱ्यांकडून अपेक्षा
गुंतवणूकदारांच्या आशा आता नवीन नेतृत्वावर अवलंबून आहेत. नवरातिल हे कंपनीचा एक अनुभवी व्यक्ती आहेत आणि २० वर्षांहून अधिक काळ नेस्लेशी संबंधित आहे. त्यांना कंपनीचे आघाडीचे ब्रँड आणि जागतिक नेटवर्क चांगले समजते. त्याच वेळी, पाब्लो इस्ला एक बाहेरील व्यक्ती म्हणून नवीन विचार आणि रणनीती आणू शकतात. इंडिटेक्सला नवीन उंचीवर नेण्यात त्याचा मोठा वाटा आहे. तज्ज्ञांचं मत आहे की, जर कंपनीला पुन्हा रुळावर आणायचं असेल तर केवळ हळूहळू सुधारणा पुरेशी ठरणार नाही. तर त्यासाठी मोठे आणि धाडसी निर्णय घ्यावे लागतील.