Join us

मध्य रेल्वेची पहिल्या तिमाहीत उत्कृष्ठ कामगिरी, पार्सल महसुलात 574% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 15:19 IST

Central Railway : मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १८.५३ दशलक्ष टनाची मालवाहतूक यशस्वीरित्या साध्य केले आहे.

मुंबई : कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊन असूनही, मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) पार्सल आणि वस्तूंच्या वाहतुकीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) ५.२५ कोटी रुपयांचा महसूल पार्सल वाहतुकीतून  मिळवला आहे, जो गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत ५७४ % वाढ दर्शविते.

मध्य रेल्वेने या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १८.५३ दशलक्ष टनाची मालवाहतूक यशस्वीरित्या साध्य केले आहे. जे गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेने ५१% अधिक आहे. किसान रेल्वे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे, कारण त्यांचे उत्पादन कमी वेळेत नव्या बाजारपेठेत पोहोचत आहे. 

मध्य रेल्वे सध्या देवळाली ते मुजफ्फरपूर, सांगोला ते आदर्श नगर दिल्ली, सांगोला ते शालीमार, रावेर ते आदर्श नगर दिल्ली आणि सावदा ते आदर्श नगर दिल्ली अशा ५ किसान रेल्वे चालवत आहे. आतापर्यंत किसान रेल्वेच्या ५३३ पेक्षा जास्त फेऱ्याद्वारे १.८२ लाख टन कृषी उत्पादने जसे की फळे, भाज्या, दुधासह अन्य नाशवंत वस्तूंची वाहतूक केली.

व्यापक विपणन प्रयत्न आणि व्यवसाय विकास युनिट्समुळे मध्य रेल्वेने कार्बन ब्लॅक फीड स्टॉक, अमोनिया, मिल स्केल लोह आणि स्टील, मोलॅसीस(मळी), जिप्सम, डोलोमाइट, कॉटन बेल इत्यादीं नवीन मालाची वाहतूक रेल्वेकडे वळविण्यात सक्षम झाली आहे. शिवाय ऑटोमोबाईल, कांदा, लोह आणि स्टील, साखर, एलपीजी आणि कोळसा यासारख्या सध्याच्या वाहतुकीत वाढ करण्यात देखील यशस्वी झाली आहे.

टॅग्स :रेल्वेमध्य रेल्वे