Join us

विकली जाणार Castrol कंपनी, रिलायन्सपासून सौदी अरामकोपर्यंत घेताहेत इंटरेस्ट; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:06 IST

इंधन कंपनी बीपी कंपनी आपला दशकांपूर्वीचा आणि जगप्रसिद्ध कॅस्ट्रोल लुब्रिकेंट्सचा व्यवसाय विकण्याच्या तयारीत आहे. या बातमीनं बाजारात खळबळ उडाली असून, जगातील बडे दिग्गज ते खरेदी करण्यासाठी मैदानात उतरलेत.

इंधन कंपनी बीपी कंपनी आपला दशकांपूर्वीचा आणि जगप्रसिद्ध कॅस्ट्रोल लुब्रिकेंट्सचा व्यवसाय विकण्याच्या तयारीत आहे. या बातमीनं बाजारात खळबळ उडाली असून, जगातील बडे दिग्गज ते खरेदी करण्यासाठी मैदानात उतरलेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं (RIL) या व्यवहारात रस दाखवला आहे. पण रिलायन्स यात एकटी नाही. या शर्यतीत जगातील सर्वात मोठी इंधन कंपनी सौदी अरामकोचाही समावेश आहे. या दोन्ही कंपन्यांची नजर कॅस्ट्रॉलच्या भारतासारख्या तेजीनं वाढणाऱ्या बाजारपेठेवर आहे.

बोलीसाठी 'हे'देखील तयार

या दोन दिग्गजांबरोबरच अमेरिकेतील प्रमुख गुंतवणूक कंपन्या अपोलो ग्लोबल मॅनेजमेंट आणि लोन स्टार फंड्सही बोली लावण्यास तयार आहेत. इतकंच नव्हे तर ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि स्टोनपीक पार्टनर्स सारख्या बड्या गुंतवणूकदारांनाही बीपीनं खरेदीसाठी आमंत्रित केलंय. काही कंपन्याही आपापसात एकत्र येऊन या शर्यतीत सामील होऊ शकतात, अशी चर्चा आहे.

Post Office मध्ये RD सुरू केली असेल तर करू नका 'ही' चूक, २.७% पर्यंत कमी होऊ शकतं व्याज

हा करार ८ ते १० अब्ज डॉलर्समध्ये (सुमारे ६६ ते ८३ हजार कोटी रुपये) पूर्ण होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या खरेदीसाठी बँकर्सही तयार आहेत. ते खरेदीदारांना सुमारे ४ अब्ज डॉलर्स (सुमारे ३३,००० कोटी रुपये) कर्ज देण्याच्या विचारात आहेत. पैशाची कमतरता भासू नये म्हणून हे कर्ज युरो आणि डॉलर अशा वेगवेगळ्या चलनात देण्याची योजना आहे. या वर्षी ज्या मोजक्या मोठ्या व्यवहारांसाठी एवढं मोठं आर्थिक पॅकेज तयार केलं जात आहे, त्यापैकी हा एक करार असेल.

का विकायचाय ब्रँड?

यामागे कंपनीची मोठी रणनीती काम करत आहे. बीपी आपल्या संपूर्ण व्यवसायाचा धोरणात्मक आढावा घेत आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे आता बीपीच्या सर्वात मोठ्या भागधारकांपैकी एक बनलेल्या इलियट इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट या अॅक्टिव्हिस्ट गुंतवणूकदाराचा दबाव. वेगवान आणि धाडसी निर्णय घेण्यासाठी इलियट कंपनीवर दबाव टाकत आहे. कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींमुळेही अडचणीत भर पडली असून, बीपीला आपली मालमत्ता चांगल्या किमतीत विकणं अधिक महत्त्वाचं झालंय.

टॅग्स :व्यवसायरिलायन्स