Join us

सुपर लेडी! १०० वेळा रिजेक्ट पण हार नाही मानली; बॉयफ्रेंडसह उभी केली २ लाख कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:15 IST

कॅनव्हाच्या सह-संस्थापक मेलेनिया पर्किन्स यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. स्वप्न पाहणं आणि कधीही हार न मानणं ही त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे.

कॅनव्हाच्या सह-संस्थापक मेलेनिया पर्किन्स यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. स्वप्न पाहणं आणि कधीही हार न मानणं ही त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. १०० हून अधिक वेळा वेंचर कॅपिटलिस्टने नाकारल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही आणि कठोर परिश्रमाने एखादी कल्पना कशी प्रत्यक्षात आणता येते हे जगाला दाखवून दिलं.

मेलेनिया पर्किन्स ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठात पार्ट टाईम टीचिंग करत होत्या. या काळात त्यांना जाणवलं की, मुलांना डेस्कटॉप डिझाइन सॉफ्टवेअर शिकवणं हे केवळ गुंतागुंतीचेच नाही तर खूप महागडं देखील आहे. येथूनच त्यांना कॅनव्हा हा एक सोपा आणि परवडणारा डिझायनिंग प्लॅटफॉर्म तयार करण्याची कल्पना सुचली.

मेलेनिया यांनी त्यांचा बॉयफ्रेंड (आता पती) क्लिफ ओब्रेक्टसोबत फ्यूजन बुक्स नावाचा वार्षिक पुस्तक प्रकाशन व्यवसाय सुरू केला. हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. त्यांनी सिडनीमधील एका हेअर सलूनमध्ये त्यांचं ऑफिस उघडलं. कॅनव्हा सुरू करण्यासाठी पैसे उभ करणं सोपं नव्हतं. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेलेनिया यांनी १०० हून अधिक व्हेंचर कॅपिटलिस्टशी संपर्क साधला, परंतु सर्वांनी ऑफर नाकारली. असं असूनही, त्यांनी हार मानली नाही. अखेर, त्यांच्या मेहनतीचं चीज झालं आणि कॅनव्हा एक यशस्वी स्टार्टअप बनला. कॅनव्हा हे एक ग्राफिक डिझाइन प्लॅटफॉर्म आहे जिथे कोणत्याही टेक्निकल ज्ञानाशिवायही उत्तम डिझाइन तयार करता येतात. 

आज कॅनव्हा व्यावसायिक डिझायनर्स तसेच सामान्य लोक वापरत आहेत. कंपनीचे ब्रीदवाक्य आहे- "सर्वांसाठी डिझाईन". कॅनव्हाने अलीकडेच त्यांचं व्हिज्युअल वर्कसूट लाँच केलं. हा वर्कसूट गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि एडोब सारख्या दिग्गजांना आव्हान देत आहे. मेलेनिया म्हणतात की, आम्ही प्रत्येक कर्मचारी आणि संस्थेसाठी साधे आणि प्रभावी डिझाइन टूल्स आणत आहोत. कॅनव्हाची व्हॅल्यू २६ अब्ज डॉलर्स (२.०८ लाख कोटी रुपये) आहे. मेलेनिया आणि क्लिफची एकूण संपत्ती ७.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी