Join us  

...तर भारतीय कंपन्यांना होणार नुकसान; सामाजिक वातावरणावर रघुराम राजन यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 5:00 PM

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलं मोठं वक्तव्य.

Raghuram Rajan News: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) हे सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवून असतात. याचदरम्यान, आता त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. देशाची अल्पसंख्यांक विरोधी प्रतिमा भारतीय वस्तूंसाठी बाजाराला नुकसान पोहोचवू शकते, असा इशारा राजन यांनी दिला. यासोबत भारतात गुंतवणूक करणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांवरही याचा परिणाम होऊ शकतो. तसंच भारत एका धारणेच्या लढाईत उतरला आहे, त्याचं आपल्याला सर्वांना नुकसान होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

“जगभरात भारताची प्रतीमा बदलत आहे. भारत लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर एक ताकदवान देश म्हणून उभारी घेत होता. परंतु आता भारताची स्थिती अल्पसंख्यांकविरोधी झाली आहे,” असं राजन म्हणाले. टाईम्सच्या इकॉनॉमिक कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात राजन सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं. “भारतात प्रत्येक नागरिकाला एकसमान आणि सन्मानजनक वागणूक दिली जाते अशी प्रतिमा होती. गरीब देश असतानाही भारत आपल्या नागरिकांप्रती जबाबदारीनं वागणारा आणि सहानुभूती असलेला देश आहे. आपल्या देशातील लोकांना चांगली वागणूक दिली अशी बाहेर भारताची प्रतिमा आहे आणि भारतीय वस्तू खरेदी करून मदत केली जावी असं वाटतं. यामुळेच जगभरात आपली बाजारपेठ मोठी होत आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

भारताच्या अशाप्रकारच्या प्रतिमेमुळे भारतातील वस्तूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी मिळत आहे. अशा प्रतिमेमुळे आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांवरदेखील परिणाम होत असल्याचं राजम म्हणाले. “जगभरातील सरकारं भारताच्या बाबतीत त्याच्या प्रतिमेनुसार भरवशाचा भागीदार आहे का नाही अशी धारणा बनवतात. गेल्या काही काळापासून चीनचीदेखील प्रतिमा जगभरात खराब झाली आहे. त्यांनी चीनमधील उइगर मुस्लीम आणि तिबेटच्या लोकांना दिलेली वागणूक योग नाही,” असं त्यांनी नमूद केलं.

भारताचे सेवा केंद्र निर्यात हे जागतिक स्तरावर व्यवसायाची संधी म्हणून चांगल्या स्थितीत स्आहे आणि त्याच्या वाढीसाठी भरपूर वाव आहे. पाश्चात्य देशांमधील गोपनीयतेचा संवेदनशील मुद्दा लक्षात घेऊन भारताच्या सेवा क्षेत्रातील निर्यात आक्रमकपणे वाढवण्याची गरज असल्याचं राजन म्हणाले.

टॅग्स :रघुराम राजनभारतीय रिझर्व्ह बँकभारतअर्थव्यवस्था