Join us

Byju'sमधील आर्थिक संकट गंभीर, कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठीही पैसे नाहीत, संस्थापकांनी घर ठेवलं गहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 10:57 IST

Byju's Financial Crisis: देशातील प्रसिद्ध ऑनलाइन लर्निंग अॅप असलेल्या बायजूसची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. हे आर्थिक संकट एवढं गंभीर बनलं आहे की, त्यामुळे बायजूसजवळ कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत.

देशातील प्रसिद्ध ऑनलाइन लर्निंग अॅप असलेल्या बायजूसची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. हे आर्थिक संकट एवढं गंभीर बनलं आहे की, त्यामुळे बायजूसजवळ कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठीही पैसे उरलेले नाहीत. त्यातून मार्ग काढण्यासाठी आता कंपनीचे संस्थापक रवींद्रन यांनी आपलं घर गहाण ठेवलं आहे, असा दावा एका वृत्तामधून करण्यात आला आहे.

एका रिपोर्टनुसार बायजूसच्या कर्मचाऱ्यांचा पगार अडकलेला आहे. तसेच कंपनीमधील आर्थिक संकट अधिकाधिक गंभीर होत चाललं आहे. कर्मचाऱ्यांना पगार मिळण्यामध्ये होत असलेल्या उशिरादरम्यान बायजू रवींद्र यांनी कर्नाटकमधील बंगळुरूमधील आपलं घर गहाण ठेवून पैसे जमवले आहेत. त्यामधून कर्मचाऱ्यांना पगार दिला जाणार आहे. ऑनलाइन लर्निंग सेक्टरमधील आघाडीची कंपनी असलेल्या बायजूमध्ये मागच्या बऱ्याच काळापासून आर्थिक संकटांची मालिका सुरू आहे. तसेच कर्ज देणाऱ्या संस्थांसोबत कंपनीची कायदेशीर लढाईसुद्धा सुरू आहे.

आणखी एका वृत्तामध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले ही, बंगळुरूमध्ये बायजू रवींद्रन यांच्या कुटुंबाच्या मालकीची दोन घरं आणि एप्सिलॉनमध्ये एक बांधाकाम सुरू असलेला व्हिला आहे. या सर्व मालमत्ता त्यांनी सुमारे १०० कोटी रुपये उधार घेण्यासाठी गहाण ठेवल्या आहेत. यामधून मिळालेली रक्कम बायजूने पॅरेंट कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेटमध्ये १५,००० कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठी वापरली आहे. मात्र याबाबत बायजूसच्या व्यवस्थापनाकडून अद्याप कुठलीही टिप्पणी करण्यात आलेली नाही.

बायजूसमधील आर्थिक संकटाचा विचार केल्यास या ऑनलाइन लर्निंग स्टार्टअपवर तब्बल ८०० दशलक्ष डॉलरचं कर्ज आहे. तसेच हल्लीच बायजूस १.५ अब्ज डॉलरच्या टर्म लोनच्या व्याजाची परतफेड करण्यात कंपनी अयशस्वी ठरली होती. त्यावरून बायजूसला कायदेशीर लढाईलाही तोंड द्यावं लागत आहे. कंपनीमध्ये सुरू असलेली उलथापालख आणि रोखीच्या संकटामुळे बायजूसच्या व्हॅल्युएशनवर परिणाम झाला आहे. तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पगारही थकले आहेत. त्यामधून तोडगा काढण्यासाठी बायजूच्या संस्थापकांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :व्यवसायपैसा