Join us
Daily Top 2Weekly Top 5

खरेदी करतो जास्त, सांगतो कमी; अखेर गुपचूप इतकं सोनं का खरेदी करतोय चीन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 16:25 IST

China Buying Gold: यावर्षी सोन्याच्या किमतीत मोठी तेजी आली आहे. अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहेत, हेही यामागचं एक मोठं कारण आहे. या देशांमध्ये चीनचाही समावेश आहे.

China Buying Gold: यावर्षी सोन्याच्या किमतीत मोठी तेजी आली आहे. अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका (Central Banks) मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहेत, हेही यामागचं एक मोठं कारण आहे. या देशांमध्ये चीनचाही समावेश आहे. चीननं यावर्षी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं आहे, परंतु अधिकृतपणे कमी खरेदी दर्शवली आहे.

एका अंदाजानुसार, चीननं यावर्षी आतापर्यंत २४० टन सोनं खरेदी केलंय, तर अधिकृतपणे त्यानं केवळ २४ टन सोनं खरेदी केल्याचं सांगितलं आहे. अधिकृतपणे चीनचा सोन्याचा साठा (Gold Reserve) २,३०४ टन आहे, परंतु तो प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा असल्याचं मानलं जात आहे.

चीनकडून 'लपून' सोन्याची खरेदी

गोल्डमॅन सॅशच्या एका अहवालानुसार, चीनने सप्टेंबरमध्ये १५ टन सोनं खरेदी केलं होतं, तर त्यानं अधिकृतपणे केवळ १.५ टन सोने खरेदी केल्याचं सांगितलं होतं. अशा प्रकारे त्यानं प्रत्यक्षात १० पट जास्त सोनं खरेदी केलं होतं. त्याचप्रमाणे, चीननं एप्रिलमध्ये २७ टन सोनं खरेदी केलं होते, जे अधिकृत आकड्यापेक्षा १३ पट जास्त आहे. अधिकृत नोंदीनुसार, ऑक्टोबरमध्ये चीननं ०.९ टन सोनं खरेदी केलं आणि त्याचा एकूण साठा २,३०४.५ टन वर पोहोचला आहे. जगात चीनपेक्षा जास्त सोन्याचा साठा असलेले पाच देश आहेत.

चीन सोने का जमा करत आहे?

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेकडे सध्या ८,१३३ टन सोन्याचा साठा आहे. कोणीही त्याच्या जवळपास नाही. अमेरिकेच्या एकूण साठ्यात सोन्याचा हिस्सा ७८% आहे. विशेष म्हणजे, गेल्या २५ वर्षांत अमेरिकेच्या सोन्याच्या साठ्यात फारसा फरक पडलेला नाही.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जर्मनी आहे, ज्याच्याकडे ३,३५० टन सोनं आहे, जो त्याच्या एकूण साठ्याचा ७८% आहे. इटलीकडे २,४५२ टन सोनं आहे, जो त्याच्या साठ्याचा ७५% आहे. त्याचप्रमाणे, फ्रान्सकडे २,४३७ टन आणि रशियाकडे २,३३० टन सोनं आहे. यानंतर चीनचा क्रमांक लागतो.

... त्यासाठी ८,००० टनपेक्षा जास्त सोनं असायला हवं

चीनचा एकूण परकीय साठा (Foreign Reserve) ३.३४ ट्रिलियन डॉलरचा आहे. यात सोन्याचा वाटा सुमारे ७% आहे, तर जागतिक सरासरी २२% आहे. साल २००९ मध्ये चीनच्या गोल्ड असोसिएशनचे तत्कालीन उप-महासचिव होऊ हुइमिन यांनी सांगितलं होतं की, त्यांच्या देशाकडे ५,००० टन सोन्याचा साठा असायला हवा. चीननं हा टप्पा गाठल्यास, त्याचा सोन्याचा साठा अमेरिकेनंतर दुसरा सर्वात मोठा असेल. जाणकारांचं म्हणणं आहे की, जर चीनला पुढील काही दशकांत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनायची असेल, तर त्याच्याकडे ८,००० टनपेक्षा जास्त सोनं असायला हवं.

English
हिंदी सारांश
Web Title : China's Secret Gold Rush: Buying More Than It Reports.

Web Summary : Despite reporting modest increases, China is secretly amassing vast gold reserves, potentially exceeding 8,000 tons, to bolster its economic power and challenge US dominance. Experts believe this hidden accumulation is a strategic move.
टॅग्स :सोनंचीन