मुंबई - देशात असहिष्णुतेचे वातावरण आहे. त्यावर काही बोलले, टीका केली तर ती योग्य पद्धतीने घेतली जाणार नाही, अशी भीती कॉर्पोरेट जगताला वाटते. या सर्व परिस्थितीवर आपण मात करायला हवी, असे उद्गार ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी मुंबईत शनिवारी झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात काढले. त्यानंतर, आता उद्योगपती हर्ष गोएंका यांनीही ट्विटरच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे उद्योगपतींच्या मनातील खदखद पुढे येत असल्याचं बोललं जातंय.
मुंबईत उद्योग जगतातील एका प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. या सोहळ्यात मुख्य भाषणानंतर उपस्थितांच्या प्रश्नांना सर्व मंत्र्यांनी उत्तरे दिली. यावेळी बोलताना, आपल्याला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, पण एक परिस्थिती मांडायची आहे, असे म्हणत राहुल बजाज यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. मी जन्मत:च व्यवस्थाविरोधी आहे. आपल्याला आवडणार नाही तरी सांगतो की, माझे राहुल हे नाव जवाहरलाल नेहरू यांनी ठेवले आहे, असे म्हणत देशातील कार्पोरेट जगतातील खंत बोलून दाखवली होती. त्यानंतर, आता आरपीजी ग्रुपचे मालक हर्ष गोएंका यांनीही ट्विट करुन मनातील खदखद व्यक्त केली आहे.