Join us

चीअर्स! महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या उद्योगसमूहाने विकतच घेतला फ्रान्सच्या कंपनीचा व्हिस्की ब्रँड, 'डील'चा आकडा वाचून डोकं गरगरेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:02 IST

Tilaknagar Industries: मराठमोठ्या व्यक्तीची टिळकनगर इंडस्ट्रीज ही देशात विदेशी मद्यनिर्मिती करणारी कंपनी आहे. ही कंपनी मॅन्शन हाऊस ब्रँडी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Tilaknagar Industries: मराठमोठ्या व्यक्तीची टिळकनगर इंडस्ट्रीज ही देशात विदेशी मद्यनिर्मिती करणारी कंपनी आहे. ही कंपनी मॅन्शन हाऊस ब्रँडी (Mansion House Brandy) बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीनं मोठा धमाका केला आहे. या देशांतर्गत कंपनीने फ्रेन्च कंपनी पर्नोड रिकार्डकडून इम्पीरियल ब्लू व्हिस्की ब्रँड खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सौदा ४,१५० कोटी रुपयांचा असेल. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण व्यवहार रोखीनं होणार आहे. सध्या या कंपनीचं कामकाज अमित डहाणूकर हे पाहत आहेत.

टिळकनगर इंडस्ट्रीजनं व्हिस्की मार्केटमध्ये तेजीनं आपलं स्थान निर्माण करण्याची योजना आखली आहे. म्हणूनच ही कंपनी फ्रेन्च कंपनी व्हिस्की ब्रँड विकत घेत आहे. या व्यवहारात काही डिफर्ड पेमेंटचीही तरतूद आहे. या करारानुसार टिळकनगर इंडस्ट्रीजला नंतर २८२ कोटी रुपये द्यावे लागतील. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर चार वर्षांनी पैसे दिले जातील. कंपनीने बुधवारी रात्री उशिरा ही माहिती दिली. येत्या सहा महिन्यांत हा करार पूर्ण होण्याची शक्यता आहे.

'बिग बीं'पासून ते SRK पर्यंत अनेकांची गुंतवणूक, आता कंपनीचा येणार IPO; पाहा काय आहेत डिटेल्स?

सर्वात मोठी डील

भारतीय कंपनीने केलेला मद्याच्या क्षेत्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ब्रॅण्डी बनविण्यात टिळकनगर इंडस्ट्रीज अगोदरच आघाडीवर आहे. इम्पीरियल ब्लू व्हिस्की विकत घेतल्यानंतर व्हिस्की मार्केटमध्येही त्यांची पकड मजबूत होण्यास मदत होईल. यामुळे त्यांना वेगवेगळ्या किमतीत व्हिस्की विकता येणार आहे. हल्ली अनेक जण स्वस्तऐवजी महागड्या व्हिस्कीला पसंती देत आहेत. लोकांचा वाढता कल पाहून टिळकनगर इंडस्ट्रीजला याचा फायदा घ्यायचा आहे.

इम्पीरियल ब्लूची स्थिती काय?

पर्नो रिकाची इम्पीरियल ब्लू व्हिस्की भारतात बरीच लोकप्रिय आहे. त्याची ९० टक्क्यांहून अधिक विक्री भारतात होते. व्हिस्कीच्या प्रमाणात हा देशातील तिसरा सर्वात मोठा ब्रँड आहे. दरवर्षी येथे इम्पीरियल ब्लू व्हिस्कीच्या २.२४ दशलक्ष केसेस विकल्या जातात. भारतीय व्हिस्की मार्केटमध्ये याचा वाटा ९ टक्के आहे. विशेष म्हणजे भारतात दरवर्षी व्हिस्कीच्या सुमारे ७.९ कोटी केसेस विकल्या जातात.

काय आहे कंपनीचा प्लान?

'ब्रॅण्डीच्या बाजारात आघाडीवर असल्यानं आता आम्हाला आपला व्यवसाय वाढवावा लागणार आहे. आम्हाला भारतातील विविध ग्राहकांपर्यंत पोहोचायचं आहे. आम्ही आमचा व्यवसाय आमच्या हिंमतीवर वाढवत आहोत, परंतु इम्पीरियल ब्लू व्हिस्की ब्रँड खरेदी केल्यानं आम्हाला विश्वासार्ह ब्रँडसह व्हिस्की बाजारात प्रवेश करण्याची संधी मिळेल," अशी प्रतिक्रिया टिळकनगर इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि एमडी अमित डहाणूकर यांनी दिली.

टॅग्स :व्यवसायमहाराष्ट्र