Join us

Budget 2025: बजेटनंतर सीनिअर सीटिझनना ट्रेन तिकिटांवर मिळणार ५०% सूट? राजधानी, शताब्दीला मिळणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:06 IST

Budget 2025: २०२५ च्या अर्थसंकल्पाकडून ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. रेल्वे तिकिटावरील सवलत पूर्ववत करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

Budget 2025: २०२५ च्या अर्थसंकल्पाकडून ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. रेल्वे तिकिटावरील सवलत पूर्ववत करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. कोरोना महासाथीपूर्वी रेल्वे तिकिटांवर ४०% ते ५०% सूट मिळत होती, परंतु कोरोनाच्या काळात ही सुविधा बंद करण्यात आली. आता महासाथीचा प्रभाव संपला असला तरी अद्याप ही सवलत लागू करण्यात आलेली नाही.

२०१९ पर्यंत मिळत होती सवलत

२०१९ च्या अखेरपर्यंत भारतीय रेल्वे मेल, एक्स्प्रेस, राजधानी, शताब्दी आणि दुरंतो सारख्या गाड्यांच्या तिकिटांवर ज्येष्ठ नागरिकांना सवलत देत होती. ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुष प्रवाशांना तिकिटांवर ४०% आणि ५८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांना ५०% सूट मिळत होती. उदाहरणार्थ, राजधानी एक्स्प्रेसचे फर्स्ट एसीचं तिकीट ४,००० रुपये असेल तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हे तिकीट २,००० किंवा २,३०० रुपयांना मिळत होतं.

कोरोनानंतर सुविधा बंद

कोरोना महासाथीच्या काळात, २०२० मध्ये सरकारनं रेल्वे तिकिटांवरील सवलत बंद केली. महासाथ संपल्यानंतरही ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली नाही. निवृत्तीनंतर उत्पन्नाची साधनं मर्यादित असल्याचं ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे. अशा तऱ्हेनं त्यांचा प्रवास रेल्वेच्या सवलतीमुळे स्वस्त झाला होता. आता त्यांना दिलासा मिळावा म्हणून ही सवलत पूर्ववत करावी, अशी त्यांची इच्छा आहे.

अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

१ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सरकारनं त्यांच्या मागणीचा अर्थसंकल्पात समावेश करावा, असं ज्येष्ठ नागरिकांचं मत आहे. यामुळे लाखो ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार असून त्यांचा प्रवास परवडणारा होणार आहे. आता अर्थमंत्री ज्येष्ठ नागरिकांची ही अपेक्षा पूर्ण करतात का, हे पाहावं लागेल. २०२५ चा अर्थसंकल्प त्यांच्यासाठी दिलासा देणारा ठरेल का? हे १ तारखेला समजेल.

टॅग्स :अर्थसंकल्प २०२५निर्मला सीतारामनकोरोना वायरस बातम्या