Brightcom group: ब्राइटकॉम ग्रुपचा शेअर बराच काळ ट्रेड करत नव्हता. कंपनीच्या शेअर्सची क्लोजिंग प्राईज १०.२८ रुपये आहे. ३० डिसेंबर २०२४ रोजी ही त्याची क्लोजिंग प्राइस होती. त्यानंतर या शेअरमध्ये व्यवहार झाला नाही आणि सहा महिन्यांपासून याचं ट्रेडिंग बंद आहे. ब्राइटकॉम समूहाचे दोन माजी अधिकारी आणि एका स्वतंत्र संचालकानं २०१४-१५ ते २०१९-२० या कालावधीत कंपनीच्या वित्तीय विवरणातील अनियमिततेशी संबंधित प्रकरण निकाली काढण्यासाठी सेबीला ३५.४ लाख रुपयांची तडजोड रक्कम दिली आहे.
अनुषा आणि व्ही श्री लक्ष्मी (बीजीएलचे माजी अनुपालन अधिकारी) आणि स्वतंत्र संचालक के. जयलक्ष्मी कुमारी यांनी वस्तुस्थितीचा निष्कर्ष स्वीकारता किंवा नाकारल्याशिवाय हे प्रकरण निकाली काढण्यासाठी तडजोड अर्ज दाखल केले होते. भारतीय बाजार नियामक सेबीला ऑक्टोबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीसाठी ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड (BGL) विरुद्ध बीजीएलच्या वित्तीय स्टेटमेंटमध्ये चुकीची माहिती / अनियमितता केल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानंतर सेबीने सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) अॅक्ट (एससीआरए) मधील तरतुदींचे संभाव्य उल्लंघन शोधण्यासाठी आर्थिक वर्ष २०१४-१५ ते २०१९-२० या कालावधीसाठी बीजीएलच्या व्यवहारांची चौकशी सुरू केली. नियामकानं ३ सप्टेंबर २०२४ रोजी अर्जदारांसह विविध संस्थांना कारणे दाखवा नोटीस (एससीएन) पाठवली होती.
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
सेबीनं काय म्हटलं?
सेबीला असं आढळून आलं की, चौकशी कालावधीत, बीजीएलच्या ऑडिट समितीच्या सदस्या जयलक्ष्मी यांनी बीजीएलनं लागू असलेल्या लेखांकन मानकांनुसार आर्थिक विवरणं प्रकाशित केली आणि कंपनीच्या कारभाराचा खरा आणि निष्पक्ष दृष्टिकोन सादर केला आहे याची खात्री करण्यात अयशस्वी ठरल्या. अनुषा आणि लक्ष्मी यांनी त्यांच्या कार्यकाळादरम्यान स्टॉक एक्सचेंजला योग्य तिमाही शेअरहोल्डिंग खुलासा करण्यात देखील अयशस्वी ठरल्या.
नियामकानं सांगितलं की लक्ष्मी यांनी एप्रिल २०१८ मध्ये अंतर्गत लेखापरीक्षकाच्या नियुक्तीबद्दल दिशाभूल करणारे प्रेस रिलीज देखील जारी केलं. अर्ज प्राप्त झाल्यानंतर सेबीने सेटलमेंटची रक्कम भरून प्रकरण निकाली काढण्याची शिफारस केली, ज्यात अनुषा यांनी १०.७२ लाख रुपये भरले, तर लक्ष्मी आणि जयलक्ष्मी यांनी १२.३५ लाख रुपये भरले. शिवाय, अनुषा यांनी बीजीएल किंवा त्याच्याशी संलग्न संस्थांशी एक वर्षापर्यंत कोणत्याही पदावर संलग्न न राहण्याचं मान्य केलं. लक्ष्मी आणि जयलक्ष्मी यांनी बीजीएल किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या कोणत्याही व्यावसायिक, रोजगार किंवा सल्लागार भूमिकेत एक वर्ष आणि दोन वर्षे सामील न होण्याचं वचन दिलं आहे. "... अर्जदारांविरुद्ध ३ सप्टेंबर २०२४ च्या एससीएन अंतर्गत सुरू केलेली कार्यवाही निकाली काढली जात आहे," असं सेबीचे पूर्णवेळ सदस्य अनंत नारायण जी यांनी आदेशात म्हटलंय.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)