Join us

७५ वरून ३५०० रुपयांपार गेला हा शेअर; आता ५ भागांत झाला स्प्लिट, कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:24 IST

Bondada Engineering Share Price : या मल्टीबॅगर शेअरमध्ये गुरुवारी चांगली तेजी पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली.

Bondada Engineering Share Price : मल्टीबॅगर स्टॉक बोंडाडा इंजिनीअरिंगच्या शेअरमध्ये गुरुवारी चांगली तेजी पाहायला मिळाली आहे. बीएसईवर बोंडाडा इंजिनीअरिंगचा शेअर ३ टक्क्यांहून अधिक वाढून ६०८.८० रुपयांवर पोहोचला. मोठी ऑर्डर मिळाल्यानं कंपनीच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली आहे. बोंडाडा इंजिनीअरिंगला मुख्यमंत्री ग्रामीण सोलार स्ट्रीट लाईट योजनेअंतर्गत बिहार रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून वर्क ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला मिळालेल्या ऑर्डरची किंमत १०८.९ कोटी रुपये आहे.

१८ महिन्यांत पूर्ण करावी लागणार ऑर्डर

बोंडाडा इंजिनीअरिंगला मिळालेल्या या ऑर्डरमध्ये स्मार्ट सोलर स्ट्रीट लाईट सिस्टीमचे डिझाइन, सप्लाय, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग आणि कमिशनिंगचा समावेश आहे. तसंच, यात ५ वर्षांचा सर्वसमावेशक देखभालीचाही करार आहे. सध्याच्या विजेच्या खांबांचा वापर करून ईपीसी तत्त्वावर हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यापासून १८ महिन्यांच्या आत ही वर्कऑर्डर पूर्ण करायची आहे. ऑक्टोबर महिन्यात बोंडाडा इंजिनीअरिंगला महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीकडून ऑर्डर मिळाली होती.

७५ रुपयांवरून ३६०० च्या पुढे गेलेला शेअर

बोंडाडा इंजिनीअरिंगचा आयपीओ १८ ऑगस्ट २०२३ रोजी खुला झाला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ७५ रुपये होती. ३० ऑगस्ट २०२३ रोजी कंपनीचा शेअर १४२.५० रुपयांवर लिस्ट झाला होता. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. बोंडाडा इंजिनीअरिंगचा शेअर २७ ऑगस्ट २०२४ रोजी ३६८४.४५ रुपयांवर पोहोचला होता. त्यानंतर आता कंपनीनं आपले शेअर्स स्प्लिट केले आहेत.

बोंडाडा इंजिनीअरिंगनं आपल्या शेअरला ५ भागांमध्ये स्प्लिट केलं आहे.. कंपनीने १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअरची २ रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या ५ शेअर्समध्ये विभागणी केली आहे. बोंडाडा इंजिनीअरिंगचं मार्केट कॅप ६५०० कोटींच्या पुढे गेलं आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक