Join us

दिग्गज विमान उत्पादन कंपनी आर्थिक संकटात; कर्मचाऱ्यांना चुकवावी लागणार किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 10:56 IST

Boeing layoff : विमान उत्पादन कंपनी बोईंग दीर्घकाळापासून अडचणीत आहे. उत्पादनात दोष आढळल्याने कंपनी आर्थिक संकट आहे.

Boeing layoff : जगभरात विमान वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्या आर्थिक संकटात सापडल्याचे समोर येत आहे. याच आठवड्यात विस्तारा कंपनीचे एअर इंडियात विलिनीकरण झाले. पूर्ण सेवा देणारी एअर इंडिया ही एकमेव कंपनी भारतात सुरू आहे. आता दिग्गज विमान उत्पादन कंपनी बोईंग खूप अडचणीत आहे. विमानांमध्ये दोष आढळल्यानंतर कंपनीला नियामक कारवाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी ८ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यातच ३३,००० कर्मचारी दीर्घ संपावर गेल्यामुळे उत्पादनावर वाईट परिणाम झाला होता. अशात कंपनीने मोठा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे.

कंपनीला सन २०२७ पासून काही उत्पदान बंद करण्यास भाग पडणार आहे. आपली खराब आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये १० टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनी सुमारे १७,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची शक्यता आहे. बोइंगचे जगभरात १ लाख ७०,००० कर्मचारी आहेत.

वाढता खर्च कमी करण्यासाठी कंपनी अशी पावले उचलत आहे. कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय जानेवारीच्या मध्यापासून लागू होण्याची शक्यता आहे. बोईंगचे बहुतेक कर्मचारी अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना आणि वॉशिंग्टन राज्यातील उत्पादन युनिटमध्ये काम करतात. कंपनीच्या सीईओ केली ऑर्टबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कंपनीची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. आधीच जाहीर केलेल्या प्रकल्पांवर काम सुरूच राहणार असल्याचे केली यांनी स्पष्ट केले.

बड्या अधिकाऱ्यांच्या नोकऱ्यावरीही कुऱ्डाड कोसळणारऑर्टबर्ग यांनी गेल्या महिन्यात कर्मचाऱ्यांना सांगितले की, नोकरीतील कपातीमध्ये अधिकारी, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांचा समावेश असेल. आपला व्यवसाय कठीण काळातून जात असून आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कठोर निर्णय घेणे आवश्यक झाले असल्याचे सीईओंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

कंपनी विमानांचे उत्पादनही बंद करणारकर्मचारी कपात व्यतिरिक्त, बोईंगने २०२७ पासून व्यावसायिक ७६७ मालवाहू विमानांचे उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, कंपनीच्या नवीन विमान 777X मध्ये आढळलेल्या तांत्रिक त्रुटींमुळे नवीन 777X चे रोलआउट २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. दोन मोठ्या अपघातांनंतर कंपनीला ७३७ मॅक्स या विमानाचे उत्पादन थांबवावे लागले होते. यामुळे कंपनीला अनेक सुरक्षा आणि नियामक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. 

टॅग्स :विमानव्यवसाय