Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:29 IST

Highest Paid CEO : ब्लॅकरॉकचे लॅरी फिंक यांचा जगातील सर्वाधिक पगार असलेल्या बिझनेस लीडरमध्ये समावेश आहे. या वर्षी त्यांनी कमाईच्या बाबतीत इलॉन मस्क, बिल गेट्स आणि जेफ बेझोस यांना मागे टाकलं आहे.

Highest Paid CEO : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींचा उल्लेख येतो, तेव्हा इलॉन मस्क, बिल गेट्स आणि जेफ बेझोस यांची नावे आवर्जून घेतली जातात. आता श्रीमंत म्हटलं की कमाईच्या बाबतीतही हे लोक पुढेच असतील असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अंदाज चुकला आहे. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्याने कमाईच्या बाबतीत ह्या सर्वांना मागे टाकलं आहे. आपण ब्लॅकरॉकचे सीईओ आणि अध्यक्ष लॅरी फिंक यांच्याबद्दल बोलत आहोत.

कंपनी काय काम करते?ब्लॅकरॉक ही जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे. ही ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक व्यवस्थापित करते. १९८८ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे ध्येय ग्राहकांचे पैसे गुंतवणून त्यातून नफा कमावून देणे आहे. २०२४ मध्ये, या कंपनीने विक्रमी नफा कमावला. याचा परिणाम कंपनीचे सीईओ फिंक यांच्या पगारावरही दिसून आला.

लॅरी यांची वर्षाची कमाई किती?गेल्या वर्षी, लॅरी फिंक यांनी ३६ कोटी ७ लाख डॉलर (२२७ कोटी रुपयांपेक्षा जास्त) कमावले, जे मागील वर्षीच्या २६ कोटी ९ लाख डॉलर उत्पन्नापेक्षा ३३ टक्के जास्त आहे. फॉर्च्यूनच्या मते, या काळात त्यांच्या पगारात कोणताही बदल झाला नाही. त्यांना सुमारे १२.७ कोटी रुपये मिळतात. पण, त्यांचा रोख बोनस ७ कोटी ९ लाख डॉलर्सवरून १० कोटी ६ लाख डॉलर्स आणि स्टॉक अवॉर्ड्स १६ कोटी ४ लाख डॉलर्सवरून २४ कोटी ६ लाख डॉलर्सपर्यंत वाढला.

यावर बोलताना ब्लॅकरॉक म्हणाले की, कंपनी कामगिरीच्या आधारावर पेमेंट करण्यावर विश्वास ठेवते. कंपनीने असेही म्हटले आहे की ती तिच्या भागधारकांच्या मताला महत्त्व देते. वास्तविक, प्रत्येकजण यावर समाधानी नाही. फॉर्च्यूनच्या अहवालात असे दिसून आले आहे की गेल्या वर्षी ब्लॅकरॉकच्या कार्यकारी वेतन योजनेला केवळ ५९ टक्के भागधारकांनी मान्यता दिली होती, जी गेल्या १० वर्षांच्या सरासरी ९३ टक्क्यांवरून कमी आहे.

वाचा - 'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट

गुंतवणूकदारांच्या चिंता योग्यरित्या सोडवल्या नाहीत यावरुन जगातील सर्वोच्च प्रॉक्सी सल्लागार फर्म असलेल्या इन्स्टिट्यूशनल शेअरहोल्डर सर्व्हिसेसने ब्लॅकरॉकवर टीका केली. यावर कंपनीने स्पष्टीकरणात म्हटले आहे, की त्यांनी त्यांच्या चिंतांबद्दल अधिकारी आणि गुंतवणूकदारांशी चर्चा केली आहे. कंपनीचे ६५ टक्के शेअर्स गुंतवणूकदारांकडे आहे. या टीकेनंतर २०२४ मध्ये कोणतेही एकरकमी स्टॉक ऑप्शन पुरस्कार दिले जाणार नाहीत, असेही कंपनीने म्हटले आहे. हे सर्व असूनही, लॅरी फिंक आज जगातील सर्वाधिक पगार असलेल्या बिझनेस लीडरपैकी एक आहेत.

टॅग्स :एलन रीव्ह मस्कबिल गेटसव्यवसाय