Join us  

ब्लॅक फ्रायडे : शेअर बाजाराला ‘न्यू’ कोरोनाचा डंख! काही तासांत गुंतवणूकदारांचे ७.३५ लाख कोटी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 6:08 AM

कोरोनाच्या नव्या विषाणूच्या भितीने जागतिक शेअर बाजारात आणि कच्च्या तेलाच्या किमतीतही पडझड पहायला मिळाली. लंडन, टोकिओ, शांघाय, फ्रँकफर्ट आणि हाँगकाँग येथील शेअर बाजार २ ते ३ टक्क्यांपर्यंत कोसळले. 

मुंबई : दक्षिण अफ्रिकेत आलेला कोरोनाचा 'न्यू' नावाचा नवा विषाणूने शेअर बाजाराला चांगलाच डंख केला. काही तासांमध्ये गुंतवणूकदारांचे ७.३५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक १६८७.९४ अंशांनी खाली येऊन ५७,१०७.१५ अंशांवर बंद झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ही ५०९.८० अंशांनी खाली येऊन १७,०२६.४५ अंशांवर बंद झाला.

जागतिक बाजारातही पडझड -कोरोनाच्या नव्या विषाणूच्या भितीने जागतिक शेअर बाजारात आणि कच्च्या तेलाच्या किमतीतही पडझड पहायला मिळाली. लंडन, टोकिओ, शांघाय, फ्रँकफर्ट आणि हाँगकाँग येथील शेअर बाजार २ ते ३ टक्क्यांपर्यंत कोसळले. 

१९ ऑक्टोबर रोजी मुंबई शेअर बाजाराने सर्वकालिन उच्चांक गाठला होता. मात्र त्यानंतर झालेल्या पडझडीत ३८ दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे १६ लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

नेमके काय घडले? - कोरोनाचा नवा विषाणू डेल्टापेक्षाही घातक असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- पुन्हा लॉकडाऊन होण्याची भीती अनेक देशांमध्ये पसरू लागली आहे. अनेक देश दक्षिण अफ्रिकेपासून सावध आहेत.

- कोरोनाचा नवा व्हेरियंट लस घेतलेल्यांवरही हल्ला चढवू शकतो, या वृत्ताने देशातील तसेच जगभरातील शेअर बाजारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

- याचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव शेअर बाजारावर आला आणि बाजार कोसळला.

- परदेशी गुंतवणकूदारांनी शेअर्सची विक्री केली आहे. त्यामुळे बाजार धाडकन कोसळला.  

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारभारतगुंतवणूक