Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 19:41 IST

Ola Electric Share Loss: गेल्या काही महिन्यांत ओलाला मोठ्या प्रमाणावर संकटांचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात ओलाचे शेअर निम्म्यावर आले आहेत. विक्री देखील घटली आहे. यामुळे ओलाच्या शेअरला उतरती कळा लागली आहे.

गेल्या काही वर्षांत सरसर करत यशाच्या शिखरावर गेलेला ओला इलेक्ट्रीकचा आलेख तसाच झरझर खाली कोसळू लागला आहे. गेल्या काही महिन्यांत ओलाला मोठ्या प्रमाणावर संकटांचा सामना करावा लागत आहे. विक्रीवरून भारत सरकारच्या यंत्रणांकडून  नोटिसांवर नोटीस आल्या आहेत. अशातच आता आणखी एक धक्कादायक बातमी येत आहे. 

ओला इलेक्ट्रीकमधून ह्युंदाई आणि कियाने आपले गुंतविलेले पैसे काढून घेतले आहेत. ह्युंदाई मोटर्सने ओलाचे २.४७ टक्के समभाग घेतले होते. तसेच कियाने देखील ०.६ टक्के समभाग घेतले होते. ही गुंतवणूक छोटीशी जरी वाटत असली तरी या कंपन्यांनी उचललेले पाऊल खूप मोठे आहे. या दोन्ही कंपन्यांनी मिळेल त्या भावाने ओला इलेक्ट्रीकचे शेअर्स विकून टाकले आहेत. दोन्ही कंपन्यांनी एकूण ६९२ कोटी रुपयांना हे शेअर विकले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार ह्युंदाईने ₹50.70 प्रति शेअर आणि कियाने ₹50.55 प्रति शेअर या दराने हे शेअर्स विकले आहेत. 

धक्कादायक बाब म्हणजे ह्युंदाईकडे ओलाचे 10.88 कोटी शेअर्स होते. तर कियाकडे 2.71 कोटी शेअर्स होते. ह्युंदाईने सर्व शेअर विकले असले तरी कियाने थोडेफार शेअर ठेवले आहेत. २०१९ मध्ये या कंपन्यांनी ओला ईलेक्ट्रीकमध्ये एकूण 2500 कोटी रुपये गुंतविले होते. त्याचे आता त्यांना केवळ ६९२ कोटी रुपये मिळाले आहेत. 

गेल्या वर्षभरात ओलाचे शेअर निम्म्यावर आले आहेत. विक्री देखील घटली आहे. यामुळे ओलाच्या शेअरला उतरती कळा लागली आहे. ओलाने नुकत्याच जारी केलेल्या चौथ्या तिमाहीच्या निकालात तोटा दुपट्टीवर गेला आहे, ओलाला ८७० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. वाहन पोर्टलनुसार, मे महिन्यात कंपनीचा बाजार हिस्सा २०% पर्यंत कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत वाहन विक्रीत ६०% घट झाली आहे. सुमार दर्जाच्या स्कूटर, त्याहून वाईट सर्व्हिस यामुळे ओलाची पुरती बदनामी झाली आहे. याचा फटका ओलाला बसू लागला आहे. 

 

टॅग्स :ओलाह्युंदाईकिया मोटर्सशेअर बाजार