PM Modi On GST Reforms: स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वस्तू व सेवा करासंदर्भात जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी यांनी दिवाळीत जीएसटीसंदर्भात मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. दिवाळीत तुम्हाला एक मोठी भेट मिळणार असून जीएसटीमध्ये सुधारणा करणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यामुळे आता देशभरातील व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मोठी भेट दिली आहे. या दिवाळीत जीएसटीमध्ये सुधारणा केली जाईल. त्यामुळे देशातील जनतेला कमी कर भरावा लागणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. या दिवाळीत 'नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म' आणले जाईल आणि याचा मोठा फायदा होईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.
"या दिवाळीत तुम्हाला खूप मोठी भेट मिळणार आहे. आम्ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्मसाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे ध्येय आता सर्व प्रकारच्या सुधारणा घडवून आणणे आहे. जीएसटी दरांचा आढावा घेणे ही काळाची गरज आहे. आम्ही नवीन पिढीतील जीएसटी सुधारणा आणत आहोत. सामान्य लोकांसाठी कर कमी केले जातील. जीएसटी दर मोठ्या प्रमाणात कमी केले जातील. या दिवाळीत ही तुमची भेट असेल. सामान्य माणसाचे कर मोठ्या प्रमाणात कमी होतील. यामुळे दैनंदिन वस्तू स्वस्त होतील आणि अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
गेल्या ८ वर्षात आम्ही जीएसटीद्वारे करप्रणाली सोपी केली आहे. आम्ही या प्रणालीचा आढावा घेतला आणि राज्यांशीही चर्चा केली आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. उद्योगांना याचा फायदा होईल असे ते म्हणाले. जीएसटीचे दर मोठ्या प्रमाणात कमी केले जातील. दैनंदिन वस्तू स्वस्त होतील, यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.