मुंबई - भारत आणि जगातील दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यावर्षी कंपनीतून १२ हजार २६१ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे मध्यमस्तरील आणि उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. ३० जून २०२५ पर्यंत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या ६ लाख १३ हजार इतकी होती. विशेष म्हणजे टीसीएसने यंदा एप्रिल-मे या तिमाहीत ५ हजार नव्या कर्मचाऱ्यांना नोकरी दिली होती.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, कंपनीचा हा निर्णय एक फ्यूचर रेडी ऑर्गेनाइजेशन बनवण्यासाठी दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे. या अंतर्गत कंपनी नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक, आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा विस्तार, नव्या जागतिक बाजारात प्रवेश करण्यावर भर देत आहे. नवीन तंत्रज्ञान आणि एआयचा अवलंब करून आम्ही स्वतःला आणि आमच्या क्लायंटना भविष्यासाठी तयार करत आहोत. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून काही कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले जाईल ज्यांना पुन्हा नियुक्त करण्याची शक्यता नाही.
नोकरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीची सुविधा
मात्र कंपनीने ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाईल त्यांच्यासाठी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात आर्थिक लाभ, आऊटप्लेसमेंट सपोर्ट, कन्सल्टिंग आणि इतर मदत केली जाईल असंही कंपनीने स्पष्ट केले आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशातील टॉप आयटी कंपन्यांचा ग्रोथ रेट खालावला असताना टीसीएसकडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावामुळे ग्राहक निर्णय घेण्यास विलंब करत आहेत, ज्यामुळे प्रकल्पांवर परिणाम होत आहे.
दरम्यान, टीसीएसशिवाय मायक्रोसॉफ्टने २०२५ मध्ये आतापर्यंत १५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. जे त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे ७% आहे. Layoffs.fyi च्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये आतापर्यंत १६९ टेक कंपन्यांमध्ये ८०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. २०२४ मध्ये हा आकडा १.५ लाख होता. एआयचा वाढता प्रभाव, मंदीची भीती आणि कंपन्यांच्या खर्च कमी करण्याच्या धोरणे ही या कपातीमागील प्रमुख कारणे आहेत असं तज्ज्ञांनी सांगितले आहे.