Donald Trump Brics Tariff Update: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफ वसूल करण्याची धमकी दिली आहे. ब्रिक्सच्या अमेरिका विरोधी धोरणांना पाठिंबा देणाऱ्या देशांकडून १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू, असे ट्रम्प म्हणाले आहेत.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडियावर एक पोस्ट करून ब्रिक्सच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त केला.
१० टक्के अतिरिक्त टॅरिफ
ट्रम्प म्हणाले, "ब्रिक्सच्या अमेरिका विरोधी धोरणांशी जोडून घेणाऱ्या कोणत्याही देशावर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्यात येईल. यात कोणालाही सोडलं जाणार नाही. या मुद्द्याकडे लक्ष दिल्याबद्दल आभार",असा धमकीवजा इशाराच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका विरोधी धोरणे इतकाच उल्लेख केला आहे. मात्र, ब्रिक्सच्या कोणत्या धोरणांना विरोध आहे, याबद्दल काहीही भाष्य केले नाही. ब्रिक्स देशांनी रविवारी एक घोषणा पत्र प्रसिद्ध केले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया आली आहे.
ब्रिक्सच्या घोषणापत्रामध्ये काय आहे?
ब्रिक्स सदस्य देशांनी जाहीर केलेल्या घोषणापत्रामध्ये एकतर्फी टॅरिफ वाढ केली जात असल्याच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका किंवा ट्रम्प यांचा कोणताही उल्लेख यात केलेला नाही. पण, यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे.
२००९ मध्ये झालेल्या पहिल्या ब्रिक्स संमेलनात ब्राझील, रशिया, भारत आणि चीनचे नेते हजर होते. भारत ब्रिक्सचा सदस्य असून, या संघटनेत नंतर इजिप्त, दक्षिण आफ्रिका, इथोपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती हे राष्ट्र सदस्य झाले.