Join us  

व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी कराल तर खबरदार! अमेरिकेची भारताला धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 9:46 AM

व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्याबाबत अमेरिकेने भारतासह अन्य देशांना गंभीर इशारा दिला आहे.

वॉशिंग्टन - गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या व्हेनेझुएलाने भारताला अधिक प्रमाणात खनिज तेल विकण्याची इच्छा नुकतीच जाहीर केली होती. मात्र व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्याबाबत अमेरिकेने भारतासह अन्य देशांना गंभीर इशारा दिला आहे. जे देश आणि आणि कंपन्या समस्यांच्या गर्तेत सापडलेले राष्ट्रपती निकोलस माडुरो यांच्याकजून होत असलेल्या लुटीचे समर्थन करतील त्यांना लक्षात ठेवले जाईल, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे. बोल्टन यांनी मंगळवारी ट्विट करून हा इशारा दिला आहे.  व्हेनेझुएलाची सरकारी कंपनी पीडीव्हीएसएचे अध्यक्ष मॅन्युअल क्युवेदो यांनी केलेले वक्तव्यानंतर बोल्टन यांनी हा इशारा दिला आहे. ग्रेटर नोएडा येथे आयोजित पेट्रोटेक संमेलनामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बंदीचा सामना करत असलेला आपला देश भारताला अधिक प्रमाणात खनिज तेल विकण्यास इच्छुक आहे, असे क्युवेदो यांनी म्हटले होते. अमेरिकेने व्हेनेझुएलाकडून होणाऱ्या खनिज तेलाच्या निर्यातीवर अंकुश लावण्याच्या इराद्याने पीडीव्हीएसए कंपनीवर बंदी घातली आहे. तसेच समाजवादी विचारसरणीचे राष्ट्रपती निकोलस माडुरो यांच्यावर पदावरून हटण्यासाठी दबाव आणला आहे.सद्यस्थितीत भारताला खनिज तेलाचा पुरवठा करणारा व्हेनेझुएला हा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार आहे. त्या पार्श्वभूमीवर क्युवेदो यांनी केलेल्या भारत दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना बोल्टन यांनी सांगितले की, ''जो देश आणि कंपन्या व्हेनेझुएलामधील संपत्तीची लूट करत असलेल्या माडुरो यांना पाठिंबा देतील त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही. तसेच व्हेनेझुएलामधील जनतेची संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिका आपल्या संपूर्ण शक्तीचा उपयोग करेल, तसेच त्यासाठी अन्य देशांनाही प्रोत्साहित करेल.''  

टॅग्स :अमेरिकाभारतखनिज तेल